बुलडाणा जिल्ह्यात अवघे तीन टक्केच पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 03:33 PM2019-05-26T15:33:35+5:302019-05-26T15:35:42+5:30
एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ असताना प्रत्यक्षात ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे अर्थात अवघे तीन टक्केच पीक कर्ज बँकांनी वाटप केलेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला असतानाच पीक कर्ज वाटपाची गती तुलनेने संथ असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरापासून दुष्काळाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती मशागतीसह, पेरणीसाठीचे बि-बियाणे खरेदीसाठी सध्या पैशाची गरज आहे. त्यानुषंगाने विचार करता एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ असताना प्रत्यक्षात ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे अर्थात अवघे तीन टक्केच पीक कर्ज बँकांनी वाटप केलेले आहे.
त्यामुळे पीक कर्जाचा वेग वाढविण्याची गरज प्रतिपादीत होत आहे. दुसरीकडे पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविण्यासोबतच दर पंधरवाड्याला लीड बँकेकडून पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास सव्वातीन लाख शेतकºयांना यंदा पीक कर्ज वाटपाचे जिल्ह्यातील व्यापारी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ग्रामीण बँकेला उदिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची दोलायमान स्थिती पाहता या बँकेवर तुलनेने कमी बोजा टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश मदार ही राष्ट्रीय बँकावरच राहणार आहे.
जिल्ह्यात खासगी बँकांना २४० कोटी ८८ लाख रुपयांचे उदिष्ठ देण्यात आले आहे. त्यापैकी या बँकांनी आतापर्यंत ७०८ शेतकºयांना ११ कोटी ५० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यांच्या एकूण उदिष्ठाच्या ते जवळपास पाच टक्के आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला २८१ कोटींचे उदिष्ट असून त्यांनी प्रत्यक्षात ४४१ शेतकºयांना तीन कोटी ९३ लाख ४२ हजार रुपयांचे पीक कर्ज दिले आहे. बँकेला मिळालेल्या उदिष्टाच्या ते अवघे दीड टक्का ही नाही.
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला ४७ कोटी २५ लाख रुपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी एक हजार ३११ शेतकºयांना जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने २० कोटी ७९ लाख रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना एक हजार २०४ कोटींचे पीक कर्जाचे उदिष्ट दिलेले आहे. मात्र या बँकांचा पीक कर्ज वाटपाचा वेग हा अत्यंत धिमा आहे. आतापर्यंत या बँकांनी एक हजार ७०२ शेतकºयांना उदिष्टाच्या १.१० टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे. जवळपास १३ कोटी २५ लाखांच्या घरात ही रक्कम जाते.
प्रत्यक्षात जिल्हयातील बँकांनी चार हजार १८२ शेतकºयांना ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.
दुसरीकडे गेल्या खरीपात शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. पावसाने ओढ दिल्याने शेतीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले. बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये २०१८ च्या तुलनेत ५०० कोटी रुपयांची आवक घटली आहे. परिणामी शेतकºयांच्या हातातील पैसाही तुलनेने घटला आहे. त्यातच शेतकरी कर्जमाफीचेही त्रांगडे कायम आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर समस्या आहेत. दुष्काळी स्थिती पाहता जवळपास ५६० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे यंदा पूनर्गठन करावे लागणार आहे.