मनुष्याचं ‘मन’हेच खरे दैवत: संतोष तोतरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 02:35 PM2019-11-18T14:35:02+5:302019-11-18T14:36:02+5:30
मनुष्याचे ‘मन’ हेच खरे दैवत आहे, असा अमृतमयी उपदेश संतोष तोतरे यांनी येथे दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : साधु संतांनी ‘मन जिंकेल...तो जग जिंकेल’ असा उपदेश दिला आहे. संतांचा हा उपदेश प्रत्येकाच्या जीवना तंतोतंत लागू पडतो. ‘चिंतना’मध्येच मनुष्य जीवनाचे नंदनवन करण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच मनुष्याचे ‘मन’ हेच खरे दैवत आहे, असा अमृतमयी उपदेश संतोष तोतरे यांनी येथे दिला.
जीवन विद्या मिशन शाखा मलकापूर शाखेच्यावतीने सदगुरू वामनराव पै यांच्या संदेशावर आधारीत ‘सुखी जीवनाची गुरूकिल्ली’ या विषयावर दोन दिवसीय प्रवचन माला स्थानिक मुक्तेश्वर आश्रमात आयोजित करण्यात आली. या प्रवचन मालेचे द्वितीय पुष्प गुंफताना संतोष तोतरे रविवारी बोलत होते. सदगुरू वामनराव पै यांच्या तत्वज्ञानातील ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा धागा धरून आपले विचार व्यक्त करीत उपस्थितांना ओतप्रोत केले. सकारात्मक विचारांचे अनेक दाखले देत त्यांनी सुमारे दीडतास सभागृह अक्षरक्ष: खिळवून ठेवले. सकारात्मक विचार आणि चिंतन हीच माणसाच्या यशस्वी होण्याची खरी गुरूकिल्ली असल्याचेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. अनिष्ट विचार करणारा माणुस कधीही सुखी होवू शकत नाही. त्यामुळे मनुष्याने आपल्या आयुष्यात नकारार्थी विचारांना कोठेही स्थान देता कामा नये, असेही ते शेवटी म्हणाले. जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी आपल्या अंतर्मनाची जडणघडण अत्यंत महत्वाची आहे. जीवनविद्येचे विचार आपल्या अंतर्मनात खोलवर रुजले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
खामगाव येथील प्रबोधन महोत्सव यशस्वी करण्यासाठी जीवन विद्या मिशन मलकापूर शाखेचे अशोक अनासने , डॉ.प्रविण गासे, राहुल कोलते , एम.ए.सुरळकर, अजय आटोळे , सचिन मुंढे , अॅड.जयंत पाटील , अनिल बंड , गणेश माकोडे , चंदु भाटीया आदींनी परीश्रम घेतले.
अनेकांनी घेतला अनुग्रह!
खामगाव येथील मुक्तेश्वर आश्रमात जीवनविद्या मलकापूर शाखेच्यावतीने दोन दिवसीय प्रबोधन महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात रविवारी शेकडो भाविकांनी सदगुरू वामनराव पै यांचा अनुग्रह घेतला. खामगाव येथे नियमित संत्सग सुरू करण्याचाही संकल्प यावेळी काहींनी केला.