तेलाची फोडणी आणते डोळ्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:34 AM2021-01-20T04:34:06+5:302021-01-20T04:34:06+5:30
सोयाबीनच्या तेलाचे भाव सतत वाढत असल्याने गोरगरीब जनतेला आता सोयाबीन तेल खाणेही परवडत नसल्याचे चित्र आहे. मागील दोन ...
सोयाबीनच्या तेलाचे भाव सतत वाढत असल्याने गोरगरीब जनतेला आता सोयाबीन तेल खाणेही परवडत नसल्याचे चित्र आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून सोयाबीन पीक चांगले होत आहे. मात्र ऐन हंगामात पिकाचे भाव पडत असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादन घेणे परवडत नाही. सध्या सोयाबीन तेलाच्या १ किलोसाठी १३५ ते १४० रुपये मोजावे लागत आहेत. ज्या सोयाबीनपासून हेच तेल बनते ते सोयाबीन केवळ ३५ ते ४० रुपये किलो आहे. अनेक वर्षांपासून सोयाबीनचे भाव उत्पन्न खर्चापेक्षाही कमीच आहेत. मात्र त्याच सोयाबीनपासून बनविण्यात येणाऱ्या खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्याने सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यालाच सोयाबीन तेल विकत घेणे परवडणारे नसल्याचे चित्र आहे. जेवणात आत्यावश्यक असलेल्या खाद्यतेलाचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊनही कोणीच याबाबत शब्दही काढताना दिसत नाही. तेलाची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रकार काही भागात सुरू आहे. शासनाने जीवनावश्यक असलेल्या खाद्यतेलाच्या किमती आटोक्यात आणण्याच्या दृष्टी प्रयत्न करून साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.