अंगणवाडी भरते उघड्यावर
By admin | Published: July 3, 2017 12:48 AM2017-07-03T00:48:07+5:302017-07-03T01:14:03+5:30
पालक चायगाव येथील अंगणवाडीवर टाकणार बहिष्कार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. ग्रामीण भागात सुरू असलेल्या अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या नसल्याने अनेक अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याने बालकांना त्रास सहन करावा लागत आहे. चायगाव येथील अंगणवाडी क्रमांक दोनला स्वतंत्र खोली नसल्याने या अंगणवाडीतील मुले उघड्यावर तर कधी झाडाखाली बसत असल्याने मुलांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. येत्या १५ दिवसात मुलांना सुविधा न दिल्यास अंगणवाडीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
शासनाने ग्रामीण भागातील ० ते ५ वयोगटातील मुला-मुलींसाठी प्रत्येक खेडेगावात अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. शासनाकडून या अंगणवाडीतील मुलांना सुविधा मिळावी, यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहेत. तर प्रत्येक अंगणवाडीला स्वतंत्र खोल्या असल्या पाहिजेत, यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे; परंतु स्थानिक अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या नसल्याने मुले चावडीमध्ये, झाडाखाली तर कधी उघड्यावर बसत आहे. त्यामुळे मुलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने अनेक गावासाठी स्वतंत्र खोल्या बांधकामासाठी निधी मंजूर केलेला आहे; परंतु स्थानिक पंचायत समिती अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे नवीन अंगणवाडी स्वतंत्र खोल्यांचे बांधकाम रखडले आहे. चायगाव येथे अंगणवाडी क्रमांक २ साठी स्वतंत्र खोली बांधकाम मंजूर झालेले आहे. स्वतंत्र खोली बांधकामासाठी जागासुद्धा उपलब्ध आहे. त्यासाठी ग्रा.पं. च्यावतीने ठराव घेण्यात आला आहे; मात्र तरीही बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. या अंगणवाडीतील मुले जिल्हा परिषद शाळेच्या आवारात तर कधी झाडाखाली बसतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने मुलांना त्रास होत आहे. निधी मंजूर असूनही केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे काम रखडले आहे.
मुलांना अंगणवाडीत न पाठविण्याचा पालकांचा इशारा
चायगाव येथील अंगणवाडी क्रमांक २ ला स्वतंत्र खोली बांधकामासाठी निधी मंजूर झालेला आहे. ग्रा.पं.चा ठराव आहे. खोली बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे; मात्र तरीही केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खोली बांधकाम रखडले आहे. स्वतंत्र खोली नसल्याने मुले ही झाडाखाली तर कधी शाळेच्या आवारात बसतात. त्यामुळे मुलांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. येत्या १५ दिवसात मुलांना सुविधा न दिल्यास अंगणवाडीत मुलांना पाठविणार नाही. तसेच अंगणवाडीवर बहिष्कार टाकू, असा इशारा भास्करराव देशमुख, वसंतराव सरोदे, लिंबाजी देशमुख, रमेश राठोड, राजू चव्हाण, रवी राठोड, लिंबाजी राठोड, उकंडा आडे, गणेश आडे, रमेश आडे, अरविंद आडे, शिवाजी मोरे, कडूबा बोरकर, गजानन बोरकर, गजानन पिछोरे, कुंडलीक देशमुख, अशोक आडे, भीमराव चव्हाण, रामेश्वर राठोड, कालीम अंभोरे, देवीदास सास्ते, उत्तम मोरे, सुभाष देशमुख, संतोष सहाने, सुधीर मोरे आदींनी दिला आहे.