दीड हजार शाळांच्या सकाळ सत्राचा मार्ग मोकळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 06:47 PM2019-03-01T18:47:42+5:302019-03-01T18:48:24+5:30
बुलडाणा: वाढते तापमान व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १ हजार ४४२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: वाढते तापमान व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १ हजार ४४२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळच्या सत्रासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ५ मार्चचा मुहूर्त शोधला आहे. २० मार्चपासून होणारी सकाळच्या सत्राची अंमलबजावणी आता ५ मार्चपासूनच होणार असल्याने विद्यार्थ्यांची उन्हाच्या झळांपासून सुटका झाली आहे.
जिल्ह्यात यावर्षी दुष्काळ असून पाणीटंचाईच्या झळा अनेक गावांना बसत आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये पिण्यास पाणी उपलब्ध नाही. परिणामी, शाळेत येणाºया मुलांना पाणी पिण्यासाठी घरी जावे लागते. त्याचबरोबर तापमानातही वाढ होत आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळेची झालेली दुरवस्था त्यात अनेक खोल्या पत्राच्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढत्या तापमानात या पत्राच्या खोलीत बसून शिक्षण घेणे अवघड आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात घेण्यात याव्या, यासाठी शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी शिक्षण विभागाकडे पत्र दिले होते. परंतू शिक्षण विभागाकडून सकाळच्या सत्रासाठी २० मार्चलाच प्राधान्य दिल्या जात होते. यासंदर्भात १ मार्च रोजी ‘लोकमत’ने ‘विद्यार्थ्यांना २० दिवस सोसावा लागणार उकाडा!’ असे वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या वृत्ताची दखल घेत सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा मार्ग मोकळा केला. १ मार्च रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षण समितीची सभा घेण्यात आली. या सभेत जिल्हा परिषद शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शिक्षण समितीचे सदस्य आशिष रहाटे यांच्यासह समितीने जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा ठराव मांडला. त्यावर सर्वांचे एकमत झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पण् तासिका पूर्ण होणार का?
सकाळच्या सत्रात शाळा भरविल्यास तासिका कमी होतील. परिणामी, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही. अशा काही कारणास्तव १ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यासाठी शिक्षण विभागाकडून आतापर्यंत नकार दिल्या जात होता; त्यामुळे शिक्षण विभागाने २० मार्च ही तारिख दिली होती. परंतू आता १५ दिवस आधीपासूनच सकाळच्या सत्रात शाळा भरणार असल्याने तासिका पूर्ण होतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वेळ निश्चित नाही!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय १ मार्च रोजी दुपारी ४ वाजता घेण्यात आला. परंतू सकाळच्या सत्रातील वेळ निश्चित होणे बाकी आहे. यामध्ये सकाळी ७ ते दुपारी १२ किंवा सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० असा वेळ निश्चित करण्यात येऊ शकतो.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २० मार्चच्या ऐवजी आता ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व तासिका पूर्ण होतील व अभ्यासक्रमामध्ये कुठलाही अथळळा येणार नाही, असे नियोजन करण्यात येत आहे.
- श्रीराम पानझाडे,
माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.
पाणीटंचाई व वाढती उष्णता यामुळे सकाळच्या सत्रात शाळा भरविणे अत्यंत आवश्यक होते. आज शिक्षण समितीने सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा ठराव घेतला. त्याचबरोबर शिक्षकांच्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली.
- आशिष रहाटे, शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद बुलडाणा.