बालकांच्या शोधासाठी ऑपरेशन ‘मुस्कान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 11:11 AM2020-12-13T11:11:23+5:302020-12-13T11:13:41+5:30
Operation Muskan हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात येणार असून, बालके आईवडिलांच्या सुपूर्द करण्यात येणार आहेत.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : हरविलेल्या अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान-२०२०’ ही मोहीम १ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्याचा आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग यांनी दिला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात येणार असून, बालके आईवडिलांच्या सुपूर्द करण्यात येणार आहेत.
हरविलेली अल्पवयीन मुले, भीक मागणारी, कचरा गोळा करणारी, मंदिर, रुग्णालय परिसरात आढळून येणारी अल्पवयीन मुले शोधण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्यावतीने राज्यभरात ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याचे तीन-चार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक गठित करण्यात आले आहे. नेमून दिलेल्या पथकाकडून हरविलेल्या बालकांच्या शोध मोहिमेला १ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली असून, अशा मुलांना शोधून त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या सुपूर्द केले जाणार आहे.
पोलीस स्टेशननिहाय पथकं गठित!
हरविलेल्या मुलांना शोधण्याकरिता अपर पोलीस अधीक्षक, खामगाव यांच्या अधिकार क्षेत्रातील १५ पोलीस स्टेशनमध्ये पथकं गठित करण्यात आले आहे. यामध्ये खामगाव विभागातील ८ तर मलकापूर विभागातील ७ अशा एकूण १५ पोलीस स्टेशनचा समावेश आहे.
काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी चार सदस्यीय पथक नेमण्यात आले. पथकातील अधिकारी, कर्मचारी हरविलेल्या आणि भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांचा शोध घेणार आहेत.
संपर्क करण्याचे आवाहन!
जिल्ह्यात हरविलेले, रस्त्यावर, मंदिर परिसरात किंवा रुग्णालय परिसरात कुठेही अल्पवयीन मुले आढळल्यास पोलीस विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी खामगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चार सदस्यीय पथक गठित केले आहे. यामध्ये एक अधिकारी, एक महिला अंमलदार आणि दोन पुरुष अंमलदार अशा चार सदस्यांचा समावेश आहे.
- सुनील अंबुलकर
निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, खामगाव.