बिबट जेरबंद करण्यासाठी ‘सर्च ऑपरेशन’
By Admin | Published: March 5, 2017 01:58 AM2017-03-05T01:58:10+5:302017-03-05T01:58:10+5:30
हरसोडा, काळेगाव क्षेत्रात शोध; शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण.
झोडगा(बुलडाणा), दि. ४- २४ फेब्रुवारी पासून हरसोडा व काळेगाव क्षेत्रात अनेक शेतकर्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या बिबटचा शोध घेण्यासाठी आता वन विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी सरनाईक यांनी आपले कर्मचार्यांसह विविध ठिकाणी कॅमेरे व पिंजरे लावले आहेत. मागील काही दिवसांपासून परिसरात बिबटाचे दर्शन घडत आहे. दोन पिल्लांसह अनेक नागरिकांना बिबट दिसला. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामावर जाण्यास भीत आहेत, तर काही शेतकर्यांनी वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वन विभागावर आरोप केले.
२४ फेब्रुवारी रोजी बिबट्याने काळेगाव शिवारात गाईची शिकार करून अनेक नागरिकांना दर्शन दिल्याने दहशत निर्माण केली. २५ फेब्रुवारी रोजी वनक्षेत्र अधिकारी सरनाईक यांनी काळेगाव शिवाराची पाहणी करून गायीच्या मृत देहाजवळ तसेच परिसरात सीसी कॅमेरे व पिंजरे लावले होते. मात्र, बिबट पिंर्जयाकडे फिरकलाच नाही आणि सीसी कॅमेर्यातही बंदीस्त झाला नाही. परंतु परिसरात त्याच्या पायाचे ठसे उमटलेले दिसले.
३ मार्च रोजी बुलडाणा येथील वन विभागाचे अधिकारी पाहणीसाठी आले असता सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान ते गावकर्यांसह विश्वगंगा नदीच्या पुलाजवळ आल्यानंतर अधिकारी व गावकर्यांना बिबट व त्याच्या दोन बछड्याचे दर्शन झाले.
काळेगाव शिवार हे १00 टक्के बागायती असून, या गावात एस.टी. बस जात नसल्याने या गावातील विद्यार्थी हरसोडा व धरणगाव या गावी शिक्षणासाठी पायी जाणे-येणे करतात.
त्यामुळे मजूर व शेतकरी शेतात जाण्यास, तर विद्यार्थी शाळेत जाण्यास धजावत नाही. तसेच या बिबट्याचा वावर पूर्णा व विश्वगंगा नदीच्या संगमाजवळ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, संगमावर घनदाट झाडी असल्याने तो या भागातच असावा, असा नागरिकांचा कयास आहे.