रेती माफियांवर कारवाई
By admin | Published: July 4, 2016 01:35 AM2016-07-04T01:35:49+5:302016-07-04T01:35:49+5:30
सिंदखेड राजा तालुक्यात रेती माफियांवर कारवाई; ६४ हजारांचा दंड वसूल.
सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : खडकपूर्णा नदीतून मोठय़ा प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक करून लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा प्रशासनाने रेती माफियांविरुद्ध धडक कारवाई करुन एक टिप्पर जप्त केले, तर दोघांकडून ६४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्ल्याळ यांनी तहसीलदार सुरडकर यांना सूचना देऊन ही कारवाई केली. खडकपूर्णा नदीवर गेलेल्या पथकाला एका टिप्पर मालकाजवळ १६ जूनची पावती आढळली. या एकाच पावतीवर आतापर्यंंत रेतीची वाहतूक करताना उघडकीस आले. यावरून हे टिप्पर पकडून किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले. टिप्पर मालकाला ४८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर अनिल नागरे यांचेकडून १६ हजार रुपये, असा एकूण ६४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई राहेरी खुर्द रेती घाटावर करण्यात आली. या पथकाने टिप्पर मालक रमेश वाघ औरंगाबाद याची पावती तपासली असता, या पावतीवर खाडाखोड करण्यात आल्याचे दिसून आले. या पावतीवर फक्त एक ब्रास रेतीचा उल्लेख होता. मात्र आतापर्यंत त्या पावतीवर ३ ते ४ ब्रास रेती अवैधरीत्या वाहतूक केल्याचे आढळून आले. साठेगाव येथील अनिल नागरे यांचे ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करताना आढळून आले. सदर पथकात नायब तहसीलदार एस.डी.वीर, तलाठी एस.पी.झोरे, मंडळ अधिकारी वाघ, तलाठी गिरी, देशमुख यांचा समावेश होता. या पथकाने २ जुलै रोजी तढेगाव, राहेरी खुर्द, पिंपळगाव कुडा, साठेगाव येथील रेती घाटाची पाहणी केली.