जिल्ह्यात १ जुलैपासून ‘आॅपरेशन मुस्कान’!
By Admin | Published: June 30, 2017 12:38 AM2017-06-30T00:38:01+5:302017-06-30T00:38:01+5:30
बुलडाणा : हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राज्यभर १ जुलैपासून ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येणार आहे.
ब्रह्मानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राज्यभर १ जुलैपासून ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येणार आहे. ‘आॅपरेशन मुस्कान’साठी जिल्हा स्तरावर नोडल आॅफिसर नेमण्यात आले असून, सध्या या मोहिमेमध्ये महाराष्ट्रात बुलडाणा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून, यावर्षी पहिल्या क्रमांकावर येण्याचा संकल्प पोलीस पथकाने घेतला आहे.
यात्रेमध्ये किंवा प्रवासादरम्यान अनेकवेळा लहान मुले हरवतात, तर काही मुले क्षुल्लक कारणावरून घरातून निघून जातात. त्यांचा शोध घेणे अवघड होते. हरवलेल्या मुलांना सुखरूप शोधणे व आई-वडिलांच्या ताब्यात देणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी गृहखात्याच्या आदेशानुसार जिल्ह्यात दोन वर्षापासून टप्प्या-टप्प्याने ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. २०१५ मध्ये आॅपरेशन मुस्कानला सुरूवात करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ या वर्षामध्ये जानेवारी, एप्रिल व जून महिन्यात पुन्हा आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आली. आता पुन्हा एक वर्षानंतर आॅपरेशन मुस्कान हाती घेण्यात येत असून, १ जुलैपासून या मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ करण्यात येणार आहे. आॅपरेशन मुस्कानमधून विविध संस्था, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, दुकाने, धार्मिक स्थळे, आश्रम, रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी ठिकाणची व भीक मागणाऱ्या मुलांची चौकशी करण्यात येईल. जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या ‘आॅपरेशन मुस्कान’साठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये एक पथकही नेमण्यात आले आहे. पोलीस यंत्रणेने आश्रमगृह, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्ते, धार्मिक स्थळे, हॉटेल, दुकाने आदी ठिकाणी राहणारी मुले व रस्त्यावर भीक मागणारी मुले यांची पडताळणी करून एखादे मूल जर बेपत्ता होऊन त्या ठिकाणी वास्तव करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या मुलांचे आई-वडील, कायदेशीर पालक यांचा शोध घेऊन ती मुले त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
मुंबई, नागपूरला टाकणार मागे
राज्यभर ‘आॅपरेशन मुस्कान’ सुरू झाल्यापासून बुलडाणा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर मुंबई व दुसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. मात्र, यावर्षी ‘आॅपरेशन मुस्कान’च्या जिल्हा पथकाने मुंबई व नागपूर या जिल्ह्यांना मागे टाकून महाराष्ट्रात सदर मोहीम यशस्वी करून प्रथक क्रमांकावर येण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेवर नोडल आॅफिसरची नजर राहणार असल्याने बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पोलिसांकडून प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.
आतापर्यंत हजारो मुलांचा लागला शोध
गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आॅपरेशन मुस्कानमुळे आतापर्यंत हजारो बालकांचा शोध लागला. आॅपरेशन मुस्कानमध्ये १ ते ३० आॅगस्ट २०१५ मध्ये २३८, १ ते ३१ जानेवारी २०१६ मध्ये ४५४ बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर १ ते ३१ एप्रिलमध्ये १११ बालकांचा शोध लागला व १ ते ३० जून २०१६ मध्ये ४०४ बालकांचा शोध लागला. एका वर्षानंतर आता पुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात १ जुलैपासून महिनाभर आॅपरेशन मुस्कान हाती घेण्यात येत आहे.
आॅपरेशन मुस्कानमुळे आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार २०७ बालकांचा शोध लागला आहे. यावर्षी १ जुलैपासून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात ‘आॅपरेशन मुस्कान’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
-शाहनवाज खान,
जिल्हा पथकप्रमुख तथा जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, बुलडाणा.