बुलढाण्यातील अंढेऱ्यात १२.६० कोटींचे अफूचे पीक जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:11 IST2025-02-22T14:11:07+5:302025-02-22T14:11:20+5:30
देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा शिवारात एका शेतामधून १२ कोटी ६० लाख २८ हजार रुपये किंमतीचे अवैधरित्या लागवड केलेले अफूचे पीक जप्त केले.

बुलढाण्यातील अंढेऱ्यात १२.६० कोटींचे अफूचे पीक जप्त
बुलढाणा: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा शिवारात एका शेतामधून १२ कोटी ६० लाख २८ हजार रुपये किंमतीचे अवैधरित्या लागवड केलेले अफूचे पीक जप्त केले आहे. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बुलढाणा पोलिसांची ही अलीकडील काळातील सर्वात मोठी कारवाई आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संतोष मधूकर सानप (४९, रा. अंढेरा) असे आहे. त्याने त्याच्या शेतात मध्यभागी कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने अफूचे पीक घेतले होते. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर, २१ फेब्रुवारी रोजी रात्री, एक पथक अंढेरा शिवारातील संतोष मधूकर सानप यांच्या शेतात गेले. थोडीफार अफूची झाडे लावली असतील असे पोलिसांना वाटले होते. परंतु प्रत्यक्ष जेव्हा शेतात पाहिले असता, तब्बल १६ गुंठ्यामध्ये अफूची लागवड करून त्याचे संवर्धन केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांचेही डोळे विस्फारले.
त्यानंतर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता, एक जनरेटर व अफूचे पीक मोजण्यासाठी एक काटा वापरून कारवाई करणाऱ्या पथकाने थेट शेतात प्रवेश केला. त्यानंतर तेथील अफूच्या पिकाची मोजणी करण्यात आली. त्यात १५ क्विंटल ७२ किलो, अर्थात १५७२ किलो वजनाची अफूची झाडे मिळाली. २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ८ वाजेपर्यंत स्थानिक गुन्हे शाखेची अंढेरा शिवारात कारवाई सुरू होती.
या प्रकरणात नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉप सब्स्टन्सेस अर्थात एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अफूचे १५ क्विंटल ७२ किलो पीक जप्त करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. गेल्या ३५ वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. एक प्रकारे अमलीपदार्थाविरोधातील ही दबंग कारवाई पोलिसांनी केली असल्याचे समोर येत आहे.
प्रकरणाचा बारकाईने तपास
या प्रकरणात परिसरातील आणखी कोणी सहभागी आहेत काय, याचा तपास सध्या स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. प्रकरणात अंढेरा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) आणि १८(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास देऊळगाव राजाच्या एसडीपीचे मनिषा कदम यांच्या कारभाराखाली चालवला जात आहे.