रक्तदानातून समाज ऋण फेडण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:28 AM2021-01-09T04:28:53+5:302021-01-09T04:28:53+5:30
बुलडाणा : समाजाचे वेगवेगळे ऋण प्रत्येकावर असतात. कोविडच्या काळात या ऋणांचे महत्त्व अधिकतेने पुढे आले. आपण समाजाला काही ...
बुलडाणा : समाजाचे वेगवेगळे ऋण प्रत्येकावर असतात. कोविडच्या काळात या ऋणांचे महत्त्व अधिकतेने पुढे आले. आपण समाजाला काही देणे लागतो. या भावनेतून हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच भावनेतून पत्रकारांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून या माध्यमातून समाज ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. बुलडाणा टिव्ही जिल्हा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्यावतीने जिल्हा पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले हाेते. यावेळी ते बाेलत हाेते. उद्घाटक म्हणून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, बुलडाणा अर्बन सोसायटीचे राधेश्याम चांडक, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन, टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष वसीम शेख, सचिव युवराज वाघ, संदीप शेळके आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, कोविड काळात पत्रकारांनी उत्कृष्ट काम करीत समाजाला जागरुक करण्याचे काम केले. त्यामुळे कोरोना विषाणू विरोधात जनजागृती होण्यास मोलाची मदत झाली.’ पत्रकारांकडून रक्तदान शिबिरासारखा स्तुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे, असे त्यांनी सांगितले. आमदार संजय गायकवाड, रविकांत तुपकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी असोसिएशनच्यावतीने नगर परिषद आदर्श उर्दू शाळेचे मुख्याध्यापक रयसोद्दीन काजी, डॉ. संचेती, पत्रकार गजानन धांडे यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिव युवराज वाघ यांनी केले. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष वसीम शेख यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन करून आभार संदीप वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.