एसटीच्या खासगीकरणास कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचा विराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:39 AM2021-08-17T04:39:31+5:302021-08-17T04:39:31+5:30
बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या होऊ घातलेल्या खासगीकरणाच्या धोरणाचा एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेेने विराेध केला आहे. याविषयी अमरावती ...
बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या होऊ घातलेल्या खासगीकरणाच्या धोरणाचा एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेेने विराेध केला आहे. याविषयी अमरावती प्रादेशिक अध्यक्ष जीवन जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व विभाग नियंत्रक यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाने ५०० साध्या गाड्या खासगी कंत्राटदार यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या खासगी गाड्या चालविण्यासाठी चालक खासगी कंत्राटदार यांचे असतील व देखभाल दुरुस्तीसाठी सुद्धा खासगी कंत्राटदार नेमण्यात येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात त्यांना देखभाल दुरुस्तीसाठी जागा देण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत, तेथे गाड्या बांधून घेण्याऐवजी खासगी गाड्या घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची वाटचाल खासगीकरणाच्या दिशेने सुरू झाली आहे, हे वेळीच थांबविले पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे. या खासगीकरणाच्या धोरणाच्या विरोधात कास्ट्राईब रा. प. कर्मचारी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, तरीही ५०० गाड्या खासगी कंत्राटदार यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा विरोध करण्यासाठी तसेच जुलै महिन्याचा पगार अद्यापपर्यंत कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात आला नाही, जुलै महिन्याचा पगार तातडीने देण्यात यावा तसेच ७ तारखेलाच नियमाप्रमाणे पगार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांची तत्काळ दखल न घेतल्यास रा. प. कास्ट्राईब संघटना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी बुलडाणा सचिव रवींद्र अवसरमोल, चिखली सचिव प्रदीप वानखेडे, भारत आराख, पद्माकर डोंगरे, हर्षदीप सोनपसारे, गणेश झोटे, सचिव जगताप, मेढे, देशमुख, कुळकर्णी, आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.