भक्ती महामार्गाला विरोध, शेतकऱ्यांचा रास्तारोको; चिखलीत आंदोलन; दोन तास वाहतूक ठप्प
By दिनेश पठाडे | Published: July 4, 2024 01:18 PM2024-07-04T13:18:41+5:302024-07-04T13:19:05+5:30
प्रस्तावित सिंदखेडराजा-शेगाव महामार्ग करण्यात येऊ नये यासाठी गेल्या साडेचार महिन्यापासून महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने वेगवेगळी आंदोलने सुरु आहेत.
बुलढाणा : प्रस्तावित सिंदखेड राजा-शेगाव भक्ती महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. वेगवेगळ्या स्वरुपात आंदोलन छेडले जात आहे. ४ जुलै रोजी चिखली येथे महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने खामगाव चौफुली येथे सकाळी रास्तारोको करण्यात आला. नागपूर,पुणे व जालना, मलकापूर राज्य मार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी २ तास रोखून धरली होती.
प्रस्तावित सिंदखेडराजा-शेगाव महामार्ग करण्यात येऊ नये यासाठी गेल्या साडेचार महिन्यापासून महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने वेगवेगळी आंदोलने सुरु आहेत.
भक्ती महामार्ग निर्मीतीला बुलढाणा जिल्हयातील शेतकऱ्यांकडून विरोध केला जात असताना सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप भक्ती मार्ग बाधित शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. चिखली येथे करण्यात आलेल्या आंदोलनात महामार्ग बाधित शेतकऱ्यांसोबत सामाजिक कार्यकर्ते व कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना( उबाठा), स्वाभिमानी शेतकरी संघटना व मनसे सह राजकीय पक्षातील पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते. कोणतीही मागणी नसताना गरज नसलेला हा महामार्ग करून शेतकऱ्याना भूमिहीन करू नये या मागणीला सक्रीय पाठींबा दिला. शेती व शेतकरी वाचविण्यासाठी आम्ही कायम शेतकऱ्याच्या सोबत राहू त्यासाठी वेळ प्रसंगी सरकारने आमच्या वर गुन्हे दाखल केले तरी ते सहन करू असा आक्रमक पवित्रा या वेळी राजकीय पदाधिकाऱ्यांनी घेतला. रस्ता रोको दरम्यान चिखलीतून जाणाा-या राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहने अडकून पडल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. या रस्ता रोको दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिखली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
या वाहनांना दिली वाट मोकळी करून
चिखली येथे खामगा्व चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे,नागपुर, तसेच मलकापुर, सोलापुर, बुलढाणा, जालना या मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी रूग्णवाहिका, स्कूल बस तसेच विविध परिक्षांकरीता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करणा-या परिक्षार्थींच्या वाहनांना वाट मोकळी करून दिली.