मुख्यमंत्र्यांनी दिले बोगस दिव्यांगांच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: June 24, 2017 05:36 AM2017-06-24T05:36:16+5:302017-06-24T05:36:16+5:30
लोकमतच्या वृत्ताचे कात्रण जोडून जिल्हय़ात सर्रास होत असलेला गैरप्रकार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हय़ात अनेक बनावट प्रमाणपत्र घेतलेले दिव्यांग कर्मचारी असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाटत आहेत. या कर्मचार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद सीईओंना दिले आहेत.
जिल्हय़ात अनेक कर्मचार्यांनी दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र घेतले आहे. दिव्यांग कर्मचार्यांसाठी असलेल्या योजनांचा हे कर्मचारी लाभ घेत असल्याचे बिंग लोकमतने फोडले. त्यानंतर काही शिक्षक संघटनांनी या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. लोकमतच्या वृत्ताचे कात्रण जोडून जिल्हय़ात सर्रास होत असलेला गैरप्रकार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकार्यांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा परिषद सीईओंनी या प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना कळविले आहे. तसेच जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्यांनाही तसे पत्र दिले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकार्यांनी चौकशी समिती नेमली आहे; मात्र एक महिना झाल्यानंतरही या समिती कोणती चौकशी केली, हे गुलदस्त्यात आहे.
जिल्हा परिषदेने शिक्षकांकडून यानंतर दिव्यांगत्वाचा लाभ घेणार नाही, असे लिहून घेतले आहे; मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतरही कारवाई करण्यात येईल काय, की मुख्यमंत्र्यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखविण्यात येईल, याकडे सर्वांंंचे लक्ष लागून आहे.