हिवरखेडच्या तत्कालीन सरपंच, सचिवासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 02:03 PM2018-12-26T14:03:21+5:302018-12-26T14:03:26+5:30
खामगाव: एका होमगार्डला रोजगार हमीच्या कामावर दाखवून अपहार केल्याप्रकरणी हिवरखेडच्या तत्कालीन सरपंच, सचिवांसह चौघांजणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश खामगाव न्यायालयाने पोलिसांना दिलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: एका होमगार्डला रोजगार हमीच्या कामावर दाखवून अपहार केल्याप्रकरणी हिवरखेडच्या तत्कालीन सरपंच, सचिवांसह चौघांजणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश खामगावन्यायालयाने पोलिसांना दिलेत. त्यामुळे तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीत एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील तत्कालीन सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य आणि रोजगार सेवकाने संगनमत करून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये भ्रष्टाचार केल्याची तक्रार विजय सैलानी शिंगाडे (४०) यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी,खामगाव यांच्या न्यायालयात केली. या तक्रारीत महादेव भगवान वानखडे हे होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. या होमगार्डला १ ते ७ एप्रिल २०१२ या कालावधीत हिवरखेड येथे रोहयो मजूर म्हणून त्यांना काम देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ३१ मार्च ते १ एप्रिल २०१२ च्या मध्यरात्रीपर्यंत ते शेगाव येथे रामनवमी उत्सवाच्या बंदोबस्तासाठी कर्तव्यावर होते. त्याचवेळी १३ एप्रिल ते १५ एप्रिल २०१२ या कालावधीत वानखडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये बंदोबस्तासाठी ड्युटी लावण्यात आली. त्याचवेळी ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांना ०८ ते १४ एप्रिलच्या कालावधीत रोहयोच्या कामावर मजुर दाखविण्यात आल्याचे नमूद केले.याशिवाय २०११ ते २०१२ या कालावधीत गावातील अनेक बोगस मजूर रोहयोच्या कामावर लावण्यात आल्याचे नमूद केले.
याप्रकरणी सुरूवातीला हिवरखेड पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली. फिर्यादीच्या तक्रारीत तथ्य असल्याने याप्रकरणी सुनावनी घेतली. त्यानंतर सबळ पुराव्याच्या आधारे शासनाच्या रक्कमेचा अपहार करण्यात आल्याचे सिध्द झाल्याने, प्रथमश्रेणी न्यायाधीश व्ही.एम. देवर यांनी हिवरखेडचे तत्कालीन सरपंच मनोहर अर्जून फुंडकर, सदस्य गजानन भगवान वानखडे, रोजगार सेवक अरविंद त्र्यंबक वाकोडे आणि तत्कालीन सचिव संजय खरत यांच्या विरोधात भादंवि ४२०, ४०९ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत. विजय शिंगाडे यांच्यावतीने न्यायालयात अॅड. विरेंद्र झाडोकार यांनी काम पाहीले.
(प्रतिनिधी)