बाजार समितीच्या आतच दुकाने लावण्याचे आदेश द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:04+5:302021-02-06T05:05:04+5:30
किनगाव जट्टू / बिबी : परिसरातील शेतकऱ्यांचा माल खरेदी-विक्री करण्याकरिता बाजार समितीच्या देखरेखीखाली व्यापारी आडते यांची दुकाने बाजार ...
किनगाव जट्टू / बिबी : परिसरातील शेतकऱ्यांचा माल खरेदी-विक्री करण्याकरिता बाजार समितीच्या देखरेखीखाली व्यापारी आडते यांची दुकाने बाजार समितीच्या आवारात लावण्याचे आदेश व्यापाऱ्यांना देण्याची मागणी लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.जे व्यापारी बाहेर दुकाने लावतात त्यांचा परवाना रद्द करून गुन्हे दाखल करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
लोणार तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या बिबी येथील उपबाजार परिसरातच पूर्वी सर्व व्यापाऱ्यांची दुकाने होती. तेथे शेतकऱ्यांच्या मालाची सर्व व्यापाऱ्यांकडून जाहीर बोली बोलून हर्राशी करून मालाची खरेदी-विक्री केल्या जात होती. परंतु गत काही वर्षापासून बिबी येथील व्यापाऱ्यांनी आपल्या सोयीने दुकाने बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर सुरू केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची कोणत्याही प्रकारची बोली किंवा हर्राशी लावली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा माल मातीमोल भावात खरेदी करून आपलेच आर्थिक चांगभलं व्यापारी करीत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. यासंबंधी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लोणार यांच्याकडे लेखी तक्रार दिली असता त्यांनीसुद्धा तत्काळ लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती यांना तक्रारी संबंधी कळवले. लोणार बाजार समितीने बिबी येथील व्यापाऱ्यांना नोटीस दिल्या. परंतु त्याकडे व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. जे व्यापारी बाजार समितीच्या आदेशाचे पालन करीत नसतील त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १० फेब्रुवारीपासून कृषी उत्पन्न बाजार समिती लोणारच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनावर अध्यक्ष सहदेव लाड, उपाध्यक्ष अनिल मोरे , सचिव अनिल लांडगे, युवा तालुका उपाध्यक्ष दत्ता सोनवणे आदींची स्वाक्षरी आहे.