वृक्षारोपण करून केले अस्थिविसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:01+5:302021-04-19T04:32:01+5:30
येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नानाभाऊ नागरे यांच्या पत्नी दुर्गाबाई नागरे (६४) यांचे १४ एप्रिल रोजी निधन झाले होते. १८ एप्रिल ...
येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नानाभाऊ नागरे यांच्या पत्नी दुर्गाबाई नागरे (६४) यांचे १४ एप्रिल रोजी निधन झाले होते. १८ एप्रिल रोजी त्यांचे रक्षा विसर्जन पार पडले. परंपरेनुसार रक्षा ही नदी पात्रात विसर्जित न करता, त्यांनी देऊळगावराजा शहर व परिसरात ६३ वटवृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करत, आज तीन वटवृक्षांचे रोपण केले. अस्थिविसर्जन नदीपात्रात किंवा इतर कोणत्याच प्रकारच्या जलाशयात न करता, वृक्षारोपणासाठी खोदलेल्या खड्ड्यात रक्षा विसर्जित करून त्यात वृक्षारोपण केले. आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रावर सन्मानजनक निधी खर्च करण्याचा मनोदय नानाभाऊ नागरे, डॉ.संदीप नागरे तथा नागरे कुटुंबीयांनी केला. जलप्रदूषण टाळत मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धन व्हावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ‘धरती बचाओ’ परिवाराच्या माध्यमातून सातत्याने केल्या जाणाऱ्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विचार सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेशदादा कायंदे यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेना नेते डॉ.रामप्रसाद शेळके, रामदास शिंदे, देवानंद कायंदे, डॉ.गणेश मांटे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, प्रकाश गीते, गणेशराव बुरकुल, मधुकरराव जायभाये, विजय इंगळे, गणेशराव डोईफोडे, रामराव महाराज डोईफोडे आदींनी वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, ही चळवळ लोकचळवळ करण्यामध्ये आम्ही सर्व तन-मन-धनाने सोबत असल्याचे सांगितले.