...अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत धडक देऊ : रविकांत तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:14 AM2021-09-02T05:14:56+5:302021-09-02T05:14:56+5:30
बुलडाणा : कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात सरकारने सैन्यभरती घेतली नाही. यामुळे सैन्य दलात जाण्याची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची वयोमर्यादा ...
बुलडाणा : कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात सरकारने सैन्यभरती घेतली नाही. यामुळे सैन्य दलात जाण्याची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. सैन्यात जाऊ इच्छिणारी शेतकऱ्यांची मुले आहेत. देशसेवेकरिता आसुसलेल्या या मुलांचे भवितव्य सैन्य दलाच्या भरतीवरच अवलंबून आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ७५ हजार जागांकरिता भरती प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १ सप्टेंबर राेजी मोर्चा काढला. सरकारने याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी; अन्यथा मोर्चा काढून दिल्लीच्या संसद भवनाला घेराव घालू, असा निर्वाणीचा इशारा तुपकर यांनी यावेळी दिला.
जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावरून या मोर्चाला प्रारंभ केला. पोलीस स्टेशन, तहसील चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्च्यात विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘वंदेमातरम्’, ‘सैन्य भरती झालीच पाहिजे...’ अशा घोषणांनी शहर दणाणून सोडले. या मोर्च्यात विद्यार्थी चांगलेच आक्रमक होते.
यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, गत दोन वर्षांपासून सैन्य भरती बंद आहे. निमलष्करी दलात १ लाख २७ हजार जागा रिक्त असताना, शासनाने केवळ २५ हजार जागांचीच भरती काढली. किमान ७५ हजार जागांची भरती करण्याची गरज आहे. भरती बंद असल्याने मुलांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. भरतीच्यावेळी दोन वर्षे वयाची मर्यादा वाढवून होतकरू युवकांना संधी द्यावी व त्यांचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणीही तुपकर यांनी यावेळी केली.
दरम्यान, सैन्य भरतीसाठी युवकांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि निमलष्करी दलात ७५ हजार जागांची भरती घेण्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.
सैन्यात टाटा, बिर्लांची पोरं नाहीत
युवकांच्या सैन्य भरतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारवर निशाणा साधताना रविकांत तुपकर म्हणाले, भारतीय सैन्यात सीमेवर ही काही टाटा, बिर्ला, अंबानींची पोरं नाहीत. डोळ्यांत तेल घालून तैनात असलेले जवान शेतकरी, कष्टकऱ्यांचीच मुले आहेत. युवकांच्या भवितव्याकरिता, त्यांना देशसेवेची संधी देण्यासाठी भरती घेणे गरजेचे असल्याचे तुपकर म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढणार
अजमेरला भरती झाली, ती कशी झाली? सैन्य दलाशी निगडित रिलेशनशीपची भरती झाली, मग या खुल्या भरतीला काय अडचण आहे, असा सवाल रविकांत तुपकर यांनी केला. युवक, विद्यार्थ्यांच्यादृष्टीने ज्वलंत असलेल्या या प्रश्नावर प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढणार असल्याचा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला.