बियाणांसाठी ६४ हजार अर्जांतून ८००० शेतकऱ्यांचेच नशीब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:24+5:302021-06-09T04:42:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलमार्फत जिल्ह्यातील ६४ हजार १३७ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलमार्फत जिल्ह्यातील ६४ हजार १३७ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली असून, केवळ आठ हजार ८१५ शेतकऱ्यांना अनुदानावर सोयाबीन बियाणे देण्यात येत आहे, तर कृषी सेवा केंद्रावर महाबीजचे सोयाबीन बियाणेही मिळत नसल्याने शेतकरी चिंतित आहे.
महाबीजने बियाणांचे दर कायम ठेवले असून, जिल्ह्यात महाबीज बियाणांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज करून अनुदानित बियाणे मिळत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी बियाणे मिळतील या आशेने अर्ज केले हाेते. जवळपास ६४ हजार १३७ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पाेर्टलवर अर्ज केले आहेत. त्यापैकी केवळ ८ हजार ८१५ शेतकऱ्यांची बियाणांसाठी लाॅटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे. इतर शेतकऱ्यांना महागडे बियाणे घ्यावे लागणार आहेत.
महागडे बियाणे कसे परवडणार
अनुदानावरील बियाणे मिळतील या आशेवर महाडीबीटी पाेर्टलवर ऑनलाइन अर्ज केला हाेता. आधीच रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच बियाणांचे दरही वाढल्याने पेरणीचे नियाेजन काेलमडले आहे. शासनाने सर्वांनाच अनुदान देण्याची गरज आहे.
लिंबाजी लखाडे, खुदनापूर
महाबीजच्या बियाणांचा तुटवडा
गत काही दिवसांपासून बियाणांसाठी दाेन ते तीन कृषी सेवा केंद्रांना भेटी दिल्या. तेथे महाबीजचे बियाणे उपलब्ध नाही. दुसरीकडे महागडे बियाणे सहजतेने उपलब्ध हाेत आहेत.
मनीष जाधव, सारशिव
पेरणीचे नियाेजन काेलमाेडले
काेराेना संक्रमणामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे शेतमाल विकता आला नाही. त्यामुळे, व्यापाऱ्यांनी पडेल भावात खरेदी केला. दाेन महिन्यांपासून सर्वच ठप्प हाेते. त्यामुळे शासनाने अनुदानातील बियाणे देण्याची गरज आहे.
कैलास गोलाईत, नागझरी