रुग्णालयातून मुदतबाह्य औषधांचे वितरण
By Admin | Published: September 22, 2016 01:32 AM2016-09-22T01:32:45+5:302016-09-22T01:32:45+5:30
लोणार येथील ग्रामीण रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार.
लोणार (जि. बुलडाणा), दि. २१- येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता येणार्या रुग्णांना मुदत संपलेल्या औषधांचे वितरण करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याकडे लक्ष देऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नगरसेवक अब्दुल उबेद अब्दुल मुनाफ सह माहेश्वरी युवा संघटनेचे प्रदेश सचिव गोपाल तोष्णीवाल यांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयाला सुरुवातीपासूनच अनेक समस्यांनी ग्रासले आहे. शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या या रुग्णालयात उपचाराकरिता येणार्या रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील रुग्णालयात उपलब्ध नाही. यानंतरही समस्यांनी आता कळसच गाठला आहे. चक्क कालबाह्य झालेल्या औषधांचे वितरण रुग्णांना करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. शहरा तील मुस्लीम समाजाच्या खैरुनीसाबी शे.यासीन ह्या २0 सप्टेंबर रोजी अंगात ताप असल्यामुळे तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात गेल्या असता, रुग्णालयातील स्टाफ नर्सने खैरुनीसा यांना शहानिशा न करता कालबाह्य झालेल्या औषधांचे वितरण केले. घरी गेल्यानंतर औषध घेण्यापूर्वी खैरुनिसा यांच्या मुलाने औषधांवरील मुदतीची तारीख त पासली असता सदर औषधांची मुदत संपल्याचे आढळून आले. ग्रामीण रुग्णालयातून कालबाह्य औषधांचे वितरण करून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचे समजले. या औषधीमुळे मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
रुग्णालय समस्यांचे माहेरघर
ग्रामीण रुग्णालयास अनेक समस्यांनी ग्रासले असून, उपचाराकरिता दुरुन रुग्णालयात येणार्या रुग्णांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. रुग्णांसाठी किंवा त्यांच्यासोबत येणार्या नातेवाईकांसाठी शिदोरी गृहाची सुविधा नाही. वेळेवर वैद्यकीय अधिकारी हजर राहत नाही. यामुळे रुग्णालयातील परिचारिकाच रुग्ण हाताळून औषधांचे वितरण करताना दिसून येतात. रुग्णालयात कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याने उपचारासाठी येणार्या रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. औषधांचा साठा असतानासुद्धा रुग्णांना कालबाह्य औषधांचे वितरण करण्यात येत आहे.