बोंडअळीचा प्रकोप, शेतात चारली मेंढरे

By विवेक चांदुरकर | Published: November 4, 2023 05:04 PM2023-11-04T17:04:09+5:302023-11-04T17:05:00+5:30

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जोरदार धुके पडल्यामुळे कपाशी पीक खराब होऊन लाल्या रोगाचे आक्रमण झाले.

Outbreak of bollworms, sheep in the field | बोंडअळीचा प्रकोप, शेतात चारली मेंढरे

बोंडअळीचा प्रकोप, शेतात चारली मेंढरे

बोरखेड (बुलढाणा) : कपाशी पिकावर बोंडअळी व लाल्या रोगाने आक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उत्पादनात घट येणार असल्याचे निदर्शनास आल्यावर बागायतदार शेतकऱ्यांनी उभ्या पिकात मेंढरे चारणे चालू केले आहे.

संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सगोडा, दानापूर, सोनाळा शिवारात शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात बागायती कपाशी पिकाची पेरणी केली, तसेच कपाशीचे पीक चांगले येईल या आशेने शेतकऱ्यांनी खते, फवारणीवर हजारो रूपयांचा खर्च केला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जोरदार धुके पडल्यामुळे कपाशी पीक खराब होऊन लाल्या रोगाचे आक्रमण झाले. त्यामुळे कपाशी पिकाची पानगळ होऊन कमी वजनाचा कापूस शेतकऱ्यांना वेचावा लागत आहे, तसेच पंधरा दिवसांपासून शेतात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पिकात मेंढरे चरायला सोडली आहेत. एकरी चार ते पाच क्विंटल शेतकऱ्यांना कपाशीचे उत्पादन आल्यामुळे पिकाला लागलेला खर्चसुद्धा निघाला नाही. कपाशीचे पीक घरात येईपर्यंत एकरी २५ ते ३० हजारांपर्यंत खर्च येतो. लाल्या रोगामुळे नुकसान होत असल्याने अखेरीस मेंढरे चारायला सुरुवात केली आहे.

व्यापाऱ्यांकडून अडवणूक

कापूस ओलसर असल्याचे कारण देत साडेसहा हजारापर्यंत कापसाची खरेदी खाजगी व्यापाऱ्याकडून चालू आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी उसनवारी, पैसे आणून कपाशीचे पीक उभे केले, अशा नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांनी मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, घरातील वृद्धांच्या आजारपण कसे काय करावे, या विवंचनेत कापूस उत्पादक शेतकरी अडकला आहे.
दोन एकर शेतात कपाशीला पन्नास हजार रुपये खर्च आला. दोन एकरांत नऊ क्विंटल कापूस निघाला. शेतात पूर्णपणे बोंडअळी आल्यामुळे दुसरे पीक घेण्याकरिता शेतात मेंढरे चारण्याचा निर्णय घेतला.
- उमेश भटकर
शेतकरी, सगोडा

Web Title: Outbreak of bollworms, sheep in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.