ग्रामीण रुग्णालयात मुदतबाह्य औषधांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 01:23 AM2017-06-14T01:23:54+5:302017-06-14T01:23:54+5:30

रुग्णांच्या जीवाशी खेळ: वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Outdated medicines allocated to rural hospitals | ग्रामीण रुग्णालयात मुदतबाह्य औषधांचे वाटप

ग्रामीण रुग्णालयात मुदतबाह्य औषधांचे वाटप

Next

सुधीर चेके पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांना मुदतबाह्य निडल्सद्वारे उपचार करण्यासोबतच मुदत संपलेल्या औषधांचा वापर करण्यात येत असून, रुग्णांशी जीवघेणा खेळ खेळल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान उघडकीस आला आहे.
चिखली तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात उपचार उपलब्ध व्हाव्यात यासाठी असलेले चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील सुमारे १६० गावांतून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात; मात्र सर्वसामान्यांसाठीच्या धन्वंतरीत राजरोसपणे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. विविध समस्यांनी ग्रासलेले येथील ग्रामीण रुग्णालय नेहमी आपल्या अनागोंदीमुळे चर्चेत असते. या रुग्णालयातील औषध वाटपबाबत मंगळवारी ओपीडी सुरू असताना माहिती घेतली असता चक्क मुदतबाह्य औषधांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सदर प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून, याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होते. या रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांवर समाधानकारक उपचार होत नाहीत. बहुतांश वेळा शवविच्छेदनाच्या समस्या उद्भावतात, कर्मचारी-अधिकाऱ्यांची कमतरता, रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य, याच परिसरात वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेली व निवासस्थाने आदी समस्यांनी येथे कळसच गाठला आहे. यात आता आणखी भर पडली असून, चक्क कालबाह्य झालेल्या औषधांचे वितरण रुग्णांना करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे निष्पन्न होत आहे. रुग्णालयात येणाऱ्या अनेक रुग्णांना कालबाह्य ठरलेल्या निडल्सद्वारे (सुई) सलाईन लावण्यात येत आहेत ज्याची एक्सपायरी डेट ही मार्च २०१७ आहे. सोबतच सलाईनसाठी वापरण्यात येणारे आय.व्ही. सेटस् आॅक्टोबर २०१६ आहे.
जुलाबाची लागण झालेल्या रुग्णांना देण्यात येणारे ‘मेट्रोनिडायझोल इंजेक्शन’ची एक्सपायरी डेट नोव्हेंबर २०१६ आहे. या व इतरही काही औषधांची मुदत संपलेली असतानाही त्यांची कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता ग्रामीण रूग्णालयात सर्रासपणे वापर होत असल्याने या जीवघेण्या खेळावर नियंत्रण कोणाचे, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये पसरली असून, यावर तातडीने कारवाई होईल का की एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत तातडीने चौकशी करून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी होत आहे.

मुदतबाह्य आढळलेली औषधे
मंगळवारी रुग्णालयात पाहणी केली असता निडल व मेट्रोनिडायझोल इंजेक्शनसह अन्य मुदतबाह्य औषधांचे वाटप रुग्णांना करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
निडल - मार्च २०१७
मेट्रोनिडायझोल इंजेक्शन - नोव्हेंबर २०१६

रिक्त पदांचेही ग्रहण
येथील ग्रामीण रुग्णालयास विविध समस्यांसह रिक्त पदांचेही ग्रहण लागले आहे. ग्रामीण रुग्णालयातील मंजूर पदांपैकी वैद्यकीय अधिकारी वर्ग-१, दंत शल्य चिकित्सक वर्ग-२, कक्ष सेवक, सहायक गट-ड ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत तसेच वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ या प्रतिनियुक्तीवर असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी रुग्णांची हेळसांड होत आहे.

Web Title: Outdated medicines allocated to rural hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.