२० हजारावर कामगार बांधकाम साहित्याच्या ‘किट’ पासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 04:19 PM2020-02-02T16:19:38+5:302020-02-02T16:19:43+5:30
कामगारांना ‘कोणी पेटी देता का पेटी..?’ अशा केविलवाण्या अवस्थेत मोलमजूरी सोडून येथे ताटकळत बसावे लागत आहे.
- सुधीर चेके पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून विशेष मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील कामगारांना चिखली येथे ‘किट’ अर्थात बांधकाम साहित्याच्या पेट्यांचे वाटप सुरू आहे. जिल्हाभरातील कामगारांची गर्दी येथे उसळली असून कागदपत्रासहित कामागारांना येथील साहित्य वितरण केंद्रावर भल्या पहाटेपासून दिवसभररांगेत उभे राहावे लागते. किट वाटपबाबात कुठल्याही प्रकारची वेळ ठरविली नसल्याने कामगारांना ‘कोणी पेटी देता का पेटी..?’ अशा केविलवाण्या अवस्थेत मोलमजूरी सोडून येथे ताटकळत बसावे लागत आहे.
यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांची प्रचंड अबाळ सुरू असल्याचे याठिकाणी दिसून आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाची प्रक्रीया चिखली येथील एमआयडीसी स्थित एका गोडाऊनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गेल्या सहा-सात महिन्यांपासून अनेक कामगार झटत आहेत. दरम्यान, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामगार अधिकारी कार्यालयाच्यावतीने साहित्य किट वितरण प्रारंभ झाल्यानंतर हजारो मजुरांनी याकडे मोर्चा वळविला. या योजनेचा लाभार्थी होण्याच्यादृष्टीने प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे. बांधकाम साहित्य किटमध्ये पत्र्याची मोठी पेटी, बूट, टोपी, बॅग, टार्च, हाताचा पंजा, टीफीन, पाण्याची बॉटल आदी वस्तूंचा समावेश असून या योजनेतील लाभार्थी कामगारांच्या खात्यात ५ हजार सरळ जमा केले जात असल्याचेही बोलले जात असल्याने प्रामुख्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी मजूरीवर पाणी सोडावे लागत आहे. असे असले तरी साहित्याची ‘पेटी’ पदारात पाडून घेण्यासाठी येथील गोडाऊनवर जिल्हाभरातील नोंदणीकृत कामगारांच्या शेकडोंच्या संख्येने रांगा लागल्या आहेत. अनेक कामगारांना पेटीतील साहित्याची चिंता लागली आहे. सोबतच पाच हजार मिळण्याच्या आशेने कामगार अर्जासहित दिवसभर रांगेत उभे राहत असल्याने मजुरी बुडण्यासह मानसिक, शारीरिक व आर्थिक झळ सोसत आहेत. त्यातच याठिकाणी अनेकदा गदारोळ होत आहे. उपाशीपोटी, लहान मुलाबाळांसह रोजगार बुडवून महिलांना येथे बसावे लागते.
आॅनलाईन नोंदणी प्रक्रीया मृगजळ
योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरूवातीला नोंदणी करणे आवश्यक असल्याने विविध कागदपत्रे, दाखले आदींची जमवाजमव करून कामगार कल्याणकारी मंडळाकडे रितसर नोंदणीसाठी मोठी कसरत कामगारांना करावी लागते. या अर्जात ठेकेदाराचा शिक्का, सहीची गरज असल्यामुळे ठेकेदाराकडेही गर्दी वाढली आहे. त्याचप्रमाणे उपयोगिता बघता अर्जाचीही किंमत वाढली आणि अर्ज भरून देणाऱ्यांची मागणी वाढली आहे.
तीन हजार पेट्यांचे वाटप
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामगार अधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील साहित्य वितरण केंद्रावरून २३ हजार ७०० पेट्यांच्या वितरणाचे उद्दीष्ट्य देण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे ३ हजार पेट्यांचे वाटप येथील केंद्रावरून झाली असल्याची माहिती राहुल लाल यांनी दिली आहे. दरम्यान साहित्य वितरणासाठी याठिकाणी कामगारांची कागदपत्रे स्विकारणे, कामगारांच्या आॅनलाईन नोंदणी प्रक्रीया आदी प्रक्रीया पूर्ण केल्यानंतरच साहित्याचे वितरण करण्यात येते.