निम्म्याहून अधिक शेतकरी आत्महत्या अपात्र!
By admin | Published: May 11, 2017 07:07 AM2017-05-11T07:07:06+5:302017-05-11T07:07:06+5:30
एकूण १२५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, यातील फक्त ५८ शेतकºयांच्या आत्महत्या शासकीय मदतीस पात्र ठरल्या.
नितीन निमकर्डे
खामगाव : मागील तीन वर्षांत तालुक्यात एकूण १२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, यातील फक्त ५८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासकीय मदतीस पात्र ठरल्या. तब्बल ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुुंबांना मदत नाकारण्यात आली. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत मिळवून देण्याबाबत प्रशासकीय स्तरावर अनास्था दिसून येत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटांशी झुंज देत आहेत. २०१४ व २०१५ मधील खरीप हंगामात पाऊस कमी पडल्याने दुष्काळी परिस्थिती होती. शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही. २०१६ मध्ये पाऊस बऱ्यापैकी होऊन उत्पादनातही मोठी वाढ झाली, पण तूर व अन्य शेतमालास भाव नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. सन २०१४ मध्ये तालुक्यात एकूण ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी फक्त १८ शेतकऱ्यांची प्रकरणे शासकीय मदतीकरिता पात्र ठरविण्यात आली. सन २०१५ मध्ये ३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असता त्यातील २३ प्रकरणे मदतीस पात्र ठरली. सन २०१६ मध्ये सर्वाधिक ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील केवळ १३ शेतकऱ्यांची प्रकरणे मदतीस पात्र ठरविण्यात आली. सन २०१७ मध्ये आतापर्यंत १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील फक्त चार मदतीस पात्र ठरल्या. अशा एकूण १२५ पैकी ५८ शेतकरी आत्महत्येची प्रकरणे मदतीस पात्र ठरली असून, ६७ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.