दुचाकी मालकाला चोरट्याने केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:50 PM2018-05-08T13:50:05+5:302018-05-08T13:50:05+5:30
जानेफळ : मागील काही दिवसापूर्वी चोरीस गेलेल्या दुचाकीबाबत हटकले असता चोरट्याने सहकाऱ्यांच्या सोबत घेवून दुचाकी मालकाला मारहाण केल्याची घटना ७ मे रोजी खामगाव तालुक्यातील अटाळी येथील बस थांब्यावर घडली.
जानेफळ : मागील काही दिवसापूर्वी चोरीस गेलेल्या दुचाकीबाबत हटकले असता चोरट्याने सहकाऱ्यांच्या सोबत घेवून दुचाकी मालकाला मारहाण केल्याची घटना ७ मे रोजी खामगाव तालुक्यातील अटाळी येथील बस थांब्यावर घडली. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी चोरट्यास अटक करून गुन्हा दाखल केला आहे. मुंदेफळ येथील पांडुरंग पूनमचंद होणे यांनी २८ एप्रिल बाजाराच्या दिवशी आपल्या मालकीची एम.एच. २८ एसी. ३८२७ या क्रमांकाची मोटार सायकल स्टेट बँकेसमोर उभी करून ते बाजार करण्यासाठी निघून गेले. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी लंपास केली. या प्रकरणी पांडुरंग होणे यांनी त्याच दिवशी पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान ७ मे रोजी मुंदेफळ येथील रमेश पूनमचंद होणे व दिलीप महाराज हे खामगावकडे दुचाकीने जात असताना अटाळी बस थांब्यावर चहा घेण्यासाठी थांबले. यावेळी तेथील देशमुख इलेक्ट्रिकल्स समोर त्यांना भाऊ पांडुरंग होणे यांच्या मालकीची दुचाकी दिसली. या दुचाकीबाबत मोहम्मद इद्रिस यास ही दुचाकी कुणाची आहे, अशी विचारणा केली असता त्याने मोटर सायकल माझी असल्याचे सांगितले. त्यानंतर या दुचाकीवरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी इद्रिसने गावातील नातेवाईकांना बोलावून रमेश होणे व दिलीप महाराज यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर रमेश होने यांनी चोरीला गेलेल्या दुचाकीची माहिती जानेफळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोहेकॉ दिलीप गवई व डव्हळे यांनी अटाळी येथे धाव घेत दुचाकीसह चोरट्यास अटक केली. यावेळी चोरटा इद्रिस यास दुचाकीबाबत विचारणा केली असता, घारोड येथील शेख राजीक व शेख युसूफ याच्याकडून दुचाकी घेतल्याचे त्याने सांगितले. याघटनेचा पुढील तपास ठाणेदार राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दिलीप गवई, शरद बाठे, अमोल बोर्डे हे करीत आहेत.