ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:58+5:302021-04-18T04:33:58+5:30

बुलडाणा : ऑक्सिजन, लस आणि रेमडेसिविरचा जिल्ह्यात तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजारांच्या घरात गेली आहे. ...

Oxygen, remedivir and vaccine also on weight | ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर

ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर

Next

बुलडाणा : ऑक्सिजन, लस आणि रेमडेसिविरचा जिल्ह्यात तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजारांच्या घरात गेली आहे. त्यातच सक्रिय रुग्णांची संख्याही सहा हजारांच्या टप्प्यात आल्यामुळे जिल्ह्यात एकदम ऑक्सिजन, रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. त्यातच टप्प्याटप्प्याने लसींचे डोस येत असल्यामुळे जिल्ह्यात या तिन्ही बाबींचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्य क्षेत्रात कोरोनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर महसूल, आरोग्य आणि जिल्हा परिषद आपसी समन्वय साधून निर्माण होणारा हा तुटवडा तारेवरची कसरत करीत कशीबशी जुळवाजुळव करीत आहे. औषधी साठा, ऑक्सिजन आणि लसीच्या उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. दैनंदिन स्तरावर आरोग्य उपसंचालक, एफडीएचा मुंबईतील नियंत्रण कक्ष, नागपूर येथील रेमडेसिविर इंजेक्शनचे स्टॉकिस्ट यांना जिल्ह्याची गरज कळविण्यात येत आहे.

--ऑक्सिजन : १२.७३ मेट्रिक टनांची गरज, उपलब्धता मात्र कमी :

जिल्ह्यास दररोज १२.७३ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासते. त्या तुलनेत उपलब्धता कमी आहे. ऑक्सिजन उपलब्धता अगदी काठोकाठ असल्याने त्याचे रोटेशन तयार करण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करीत आहे. शासकीय रुग्णालयांची दररोजची गरज ६.४८ मेट्रिक टन गरज आहे. खासगी रुग्णालयांची ६.२५ मेट्रिक टन दररोजची गरज आहे. महिन्याकाठी जिल्ह्यास सध्या ३९५ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. मात्र, त्या तुलनेत उपलब्धता कमी आहे. ऑक्सिजन प्लांट २० केएलचा असताना प्रत्यक्षात ६ केएलच लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होत आहे.

पुढे काय :- येत्या तीन दिवसांत पुन्हा १० केएल लिक्विड ऑक्सिजन जिल्ह्यास उपलब्ध होणार आहे. त्यानंतर स्थिती सुरळीत होईल.

--रेमडेसिविर : मागणी दोन हजार इंजेक्शनची मिळतात दीड हजार--

जिल्ह्यात अंदाजानुसार २००० रेमडेसिविरची गरज असून, प्रत्यक्षात १,५७६ रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहे. दरम्यान, रेमडेसिविरच्या मागणीत चढउतार येत असल्यामुळे १५ एप्रिल रोजी प्राप्त दीड हजार रेमडेसिविर इंजेक्शनपैकी ८३३ इंजेक्शन १६ एप्रिल रोजी उपयोगात आणण्यात आली आहेत.

पुढे काय:- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, एप्रिल-मे अखेर सक्रिय रुग्णांची संख्या घटण्याची शक्यता पाहता मागणीतही घट होईल.

--लसीकरण : एक दिवस पुरेल एवढाच साठा--

जिल्ह्यात सध्या एक दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा आहे. दररोजची गरज ८००० डोसची आहे. १५ एप्रिल रोजी १६ हजार १७० डोस उपब्ध होते. ते आज संपतील. लसींच्या डोसची आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे.

पुढे काय:- १७ एप्रिल रोजी ७७२० लसींचे डोस उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Oxygen, remedivir and vaccine also on weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.