नेत्र शस्त्रक्रियांचा वेग मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:06+5:302021-05-13T04:35:06+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील नेत्रशस्त्रक्रिया विभागाचे काम चांगले आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी येथील नेत्रविभागात विक्रमी अशा शस्त्रक्रिया केल्या गेल्यामुळे राज्यात दुसरा ...
बुलडाणा जिल्ह्यातील नेत्रशस्त्रक्रिया विभागाचे काम चांगले आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी येथील नेत्रविभागात विक्रमी अशा शस्त्रक्रिया केल्या गेल्यामुळे राज्यात दुसरा क्रमांक येथील नेत्रविभागाचा आला होता. सोबतच नेत्रदानासंदर्भातही या विभागातर्फे जनजागृती करण्यात येते. मरणोत्तर नेत्रदानासही प्रोत्साहन दिले जाते. सोबतच आधुनिक उपकरणेही येथे उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील नेत्ररुग्णांचा कल हा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे असतो.
--शस्त्रक्रिया सुरू आहेत---
कोरोना संसर्गाच्या काळातही जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागात डोळ्यांचे आजार असणाऱ्यांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. खबरदारी म्हणून ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे त्यांची प्रथमत: कोरोना चाचणी केली जाते. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
--शस्त्रक्रियांचे प्रमाण घटले--
जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रशस्त्रक्रिया विभाग सुरू आहे. जेथे दररोज आम्ही साधारणत: २० शस्त्रक्रिया करत होतो, तेथे आज केवळ दोन शस्त्रक्रिया होत आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात अनेक जण डोळ्यांच्या तपासणीसाठी येण्याचे टाळत आहेत; मात्र आमच्याकडे आलेल्या रुग्णांची आम्ही आधी कोरोना चाचणी करून गरजेनुरूप त्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेस प्राधान्य देत आहोत, असे नेत्रचिकित्सा विभागाचे नोडल अधिकारी अविनाश चिंचोले यांनी सांगितले.
-शासकीय रुग्णालयात कोरोना आधी महिन्याला होणाऱ्या शस्त्रक्रिया : ६००
- गेल्या वर्षभरातील नेत्रशस्त्रक्रिया : ७२०