कोरोनाबाधित लहान मुलांसाठीही ‘जनआरोग्य’ योजनेत पॅकेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 09:44 AM2021-05-19T09:44:40+5:302021-05-19T09:44:50+5:30
Buldhana News : पॅकेज अंतर्गत कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसंगी लहान मुलांना फटका बसण्याची शक्यता पाहता ‘जनआरोग्य’ योजनेत लहान मुलांसाठी श्वसनाशी संबंधित पॅकेज देण्यात आले आहे. त्यामुळे या पॅकेज अंतर्गत कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात दुसऱ्या लाटेदरम्यान जवळपास ४५ मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे.
दुसरीकडे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्य विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. कोविड समर्पित रुग्णालयात लहान मुलांसाठी २० खाटांचा एक कक्ष उभारण्यासोबतच जनआरोग्य योजनेतंर्गत लहान मुलांच्या एका खासगी रुग्णालयासही कोरोना उपचारासाठी मान्यता देण्यात आली असल्याची माहिती जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी दिली.
जिल्ह्यात जनआरोग्य योजनेतंर्गत मोठ्या व्यक्तींच्या कोविड उपचारासाठी नुकतीच सहा खासगी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. गेल्या १४ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत जिल्ह्यातील १०४३ बाधितांवर मोफत उपचार करण्यात आले आहे. दरम्यान या योजनेबाबत योग्य पद्धतीने मधल्या काळात जनजागृती न झाल्यामुळे अनेकांना योजनेची फारशी माहिती नव्हती. त्या पार्श्वभूमीवर जनआरोग्य योजनेचे ल्हा समन्वयक यांनी अनुषंगिक माहिती दिली.
मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांच्या कोरोनावरही उपचार करण्यासाठी सहा प्रकारचे पॅकेज उपलब्ध असून किमान २० हजार ते दीड लाख रुपयापर्यंतचा इलाजही यामध्ये मोफत हाेऊ शकतो असे ते म्हणाले. त्यातच बुलडाणा जिल्हा हा अवर्षणग्रस्त जिल्ह्यामध्ये मोडत असल्याने या योजनेचा लाभ शासनाच्या १६ प्रकारच्या ओळखपत्र तथा अन्य कागदपत्राच्या आधारे घेता येतो. व्हॉटसॲपवर सुद्धा कागदपत्रे दिल्यास रुग्णाचा योजनेत समावेश केला जाऊ शकतो. खामगाव येथील डॉ. सोनटक्के यांनीही या योजनेत ६ पॅकेज असल्याचे सांगितले.
८ ते १० वर्ष वयोगाटील मुलांची संख्या अधिक
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेदरम्यान ८ ते १० वर्ष वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. ७ ते ८ महिन्याच्या लागण झालेल्या मुलांवर बुलडाणा आणि खामगाव येथे उपचार करण्यात आले असल्याचे डॉ. सोनटक्के म्हणाले. बुलडाणा व खामगाव शहर मिळून आतापर्यंत जवळपास ४५ मुलांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे.