अष्टमीला निघाली दोन शक्तीपिठांना जोडणारी पदयात्रा; रेणुका मातेकडे घातले साकडे
By ब्रह्मानंद जाधव | Published: October 22, 2023 05:43 PM2023-10-22T17:43:27+5:302023-10-22T17:43:34+5:30
बुलढाणा ते चिखली अशी २५ किलोमीटरची ही पदयात्रा होती.
बुलढाणा : जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. रोजगार, सिंचन, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज, महिला सक्षमीकरण आदी प्रश्न मार्गी लागण्याचे साकडे जगदंबा माता, रेणुका मातेकडे घालण्यात आले. वन बुलढाणा मिशनच्यावतीने २२ ऑक्टोबर रोजी अष्टमीला बुलढाणा ते चिखली या दोन शक्तीपिठांना जोडणारी पदयात्रा काढली.
बुलढाणा ते चिखली अशी २५ किलोमीटरची ही पदयात्रा होती. या पदयात्रेत राजर्षी शाहू परिवाराच्या मालती शेळके यांच्यासह हजारोच्या संख्येने महिला व पुरूष सहभागी झाले होते. वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी पहाटे सहा वाजता बुलढाणा येथील जगदंबा देवीची आरती करुन पदयात्रेला सुरुवात झाली. रस्त्याने जागोजागी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन पदयात्रेला पाठिंबा दिला. परिवर्तन पदयात्रेत महिला, पुरुष, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने घोषणा देण्यात आल्या. भजनी मंडळांनी भजन, कीर्तन गात पदयात्रेत अध्यात्म अन् विकासाचा गजर केला. चिखलीत पोहचल्यावर पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत झाले. चिखलीचे आराध्य दैवत रेणुका मातेला पातळ चढवून दर्शन घेण्यात आले. यावेळी संदीप शेळके यांनी मार्गदर्शन केले. या पदयात्रेच्या माध्यमातून दोन शक्तीपीठांना विकासाचे साकडे घालण्यात आले. जिल्ह्याच्या मागासलेपणाचे सीमोल्लंघन करण्याची शपथ घेण्यात आली.
पदयात्रेत घडले कृषी संस्कृतीचे दर्शन
बुलढाणा परिवर्तन पदयात्रेत सजवलेल्या बैलगाड्यात ठेवण्यात आलेली जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, शेतकऱ्याची प्रतिकृती यामुळे कृषी संस्कृतीचे दर्शन घडले. तसेच विकासाच्या विविध मागण्यांच्या फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधले. जिल्ह्याला विशेष दर्जा मिळालाच पाहिजे, प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभारा, सोयाबीन कापसाला चांगला भाव द्या, यलो मोझॅक नुकसान भरपाई मिळावी, जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झाले पाहिजे, बुलढाणा पर्यटन प्राधिकरण स्थापन करा, सिंदखेडराजात महिलांना विविध क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण देणारे शक्तिकेंद्र, देऊळगाव राजा येथे सीड हब झाले पाहिजे, लोणारला ग्लोबल बायो डायव्हर्सिटी पार्क, जिल्ह्यात कडधान्य, भरडधान्य पार्क उभारा, बुलढाण्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करा, गावोगावी रनिंग ट्रॅक झाले पाहिजे आदी मागण्यांचे फलक परिवर्तन पदयात्रेत चालणाऱ्यांनी हाती घेतले होते.