कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी सरसावले चित्रकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:33 AM2021-05-15T04:33:36+5:302021-05-15T04:33:36+5:30
कर्करोगाच्या रुग्णांसाठी काम करणाऱ्या सीपीएए या संस्थेने २४ भारतीय प्रसिद्ध चित्रकारांच्या साथीने ऑनलाइन प्रदर्शनातून कर्करोगासाठी निधी उभारण्यासाठी पुढाकार घेतला ...
कर्करोगाच्या रुग्णांसाठी काम करणाऱ्या सीपीएए या संस्थेने २४ भारतीय प्रसिद्ध चित्रकारांच्या साथीने ऑनलाइन प्रदर्शनातून कर्करोगासाठी निधी उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रदर्शनात २४ चित्रकारांच्या ४८ कलाकृतींचा समावेश आहे. ‘कलर्स ऑफ लाइफ-आर्ट ब्रिंग्स् होप’ या शीर्षकाखाली आयोजित या प्रदर्शनातील कलाकृतींच्या विक्रीतून जमा होणारा निधी कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे. हे प्रदर्शन २६ मेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रामुख्याने कोविड आणि लॉकडाऊनमुळे कर्करोगाच्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांच्या उपचारासाठी मदतनिधी गोळा करण्यासाठी हे प्रदर्शन आहे. याअनुषंगाने सीपीएएच्या कार्यकारी संचालक डॉ. शुभा मुदगल व संस्थेच्या पुढाकाराला प्रतिसाद मिळत असल्याचे येथील चित्रकार सुनील बांबल यांनी सांगितले. 'कॅन्सर.ओआरजी.इन/कलर्सऑफलाईफ/सीओएल-२१-मे.एचटीएम' या संकेतस्थळावरून या प्रदर्शनीला भेट देण्यासह कॅन्सर पीडितांच्या मदतीसाठी चित्र खरेदीचे आवाहन चित्रकारांनी केले आहे. कलाकारांमध्ये आनंद धर्माधिकारी, आशिष मोंडल, भारत सयाम, धन प्रसाद, जीबन बिश्वास, जोएल गिल, कुमार विकास सक्सेना, एम. सिंह, मदन पवार, ओंकार सिंग, पी. ज्ञान, पराग बोरसे, प्रभू दयाल वर्मा, प्रकाश आंबेगोनकर, रघू नेवरे, रमण अडोणे, रणजित सरकार, रूपेश सोनार, रनिथ रघुपती, संजीब कुमार गोगोई, शेखर रॉय, सुनील बंबल, सुनीरमल मैती आणि तपन दश या प्रसिध्द चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे.
चिखलीच्या सुनील बांबल यांच्या दोन कलाकृतींचा समावेश
कॅन्सर पेशंट्स ॲण्ड असोसिएशन ही संस्था ५० वर्षांपासून कॅन्सर पीडितासांठी मदतनिधी उभारण्याचे काम करते. दरवर्षी 'कलर ऑफ लाईफ' या नावाने चित्र-शिल्प प्रदर्शन भरविण्यात येते. भारतातून विविध शहरांतील चित्रकारांची किमान दोन ते तीन चित्र या प्रदर्शनासाठी ते निवडतात. येथील चित्रकार सुनील बांबल यांच्या दोन कलाकृतींचा निवड करण्यात आलेली आहे.