पळशी व मलकापूर ग्रामीणची २४ मार्चला निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 06:07 PM2019-02-23T18:07:14+5:302019-02-23T18:07:46+5:30
बुलडाणा: खामगांव तालुक्यामधील पळशी बु. आणि मलकापूर तालुक्यामधील मलकापूर ग्रामीण या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक
बुलडाणा: खामगांव तालुक्यामधील पळशी बु. आणि मलकापूर तालुक्यामधील मलकापूर ग्रामीण या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून २०१९ या कालावधीत संपणार आहे. दरम्यान, मेहकर तालुक्यातील वडाळी व संग्रामपूर तालुक्यातील उमरा या ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या पोट निवडणूकीचाही कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा कमी ग्रामपंचायतींच्या निवडणूका असल्याने त्यासाठीची आचार संहिता ही संपूर्ण जिल्ह्यात लागू होणार नाही. परंतु, ज्या तालुक्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत, त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहील. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या सिमेलगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहीता लागू राहील. निवडणुकीचा निकाल जाहीर होईस्तोवर ही आचार संहिता लागू राहणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
पाच मार्च ते नऊ मार्चला सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारल्या जाणार आहेत. २४ मार्चला सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीत मतदान होईल. २५ मार्च रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणूकीची अधिसूचना संबंधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.