देऊळगाव राजा येथे २१ तास चालला पालखी सोहळा; साडेतीनशे वर्षांची परंपरा
By संदीप वानखेडे | Published: October 24, 2023 03:31 PM2023-10-24T15:31:30+5:302023-10-24T15:31:43+5:30
हजारो भाविकांनी घेतले श्री बालाजी महाराजांचे दर्शन
देऊळगाव राजा : तिरुपती बालाजींचे प्रतिरूप असलेल्या देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला भक्तांनी मोठी गर्दी केली होती. सोमवारी मध्यरात्रीनंतर सुरूवात झालेला पालखी सोहळा तब्बल २१ तास चालला. ५२ ठिकाणी पालखी थांबवून हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
श्रींची मूर्ती विराजमान असलेली पालखी सोमवारी मध्यरात्री लक्ष्मी रमणा गोविंदा, श्री बालाजी महाराज की जय या घोषणेने मंदिराबाहेर निघाली. तत्पूर्वी राजे विजयसिंह जाधव यांच्या हस्ते आरती झाली. वर्षभरातून एकदाच श्री बालाजी महाराजांच्या मूर्तीला चरण स्पर्श करून दर्शन घेण्याचा लाभ भाविकांना मिळतो. त्यामुळे भाविकांची संख्या वाढलेली होती. पालखी सोहळा माळीपुरा रस्त्यावरून थेट आमना नदीपात्राजवळ पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास आली. तेथे रावण दहन करण्यात आले.
येथे सीमा उल्लंघन सोहळा पार पडला. नंतर आमना नदी तीरावरून श्री धोंडीराम महाराजांच्या मठाजवळून पालखी सावखेड, भोईवेस, जुनी कमिटी चौक, अहिंसा मार्ग, जाफराबाद वेशी मार्गे मंदिराकडे आली. ज्या ठिकाणी पालखी थांबली तेथे भाविकांनी दर्शन घेतले. मंदिरासमोर आल्यानंतर पुजाऱ्यांनी अभिषेक करून परत श्री बालाजी महाराजांची मूर्ती सिंहासनावर विराजमान केली. या सोहळ्यासठी विदर्भासह मराठवाड्यातून भाविका उपस्थित होते.
दिंड्या, ढोल पथकांनी वेधले लक्ष
या पालखी सोहळ्यात, अनेक भाविक भक्तांच्या दिंड्या, ढोल पथक, बँड पथक सहभागी झाले होते. दिंड्यांसह ढोल पथके भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांची जबाबदारी पार पडली
पोलिसांचा चोख बंदोबस्त
पालखी सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी देऊळगाव राजा पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
१ नोव्हेंबर रोजी लळीत उत्सव
श्री बालाजी महाराजांच्या यात्रा महोत्सवादरम्यानचा सर्वात महत्त्वाचा उत्सवमध्ये लळीत उत्सव. हा उत्सव एक नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी सर्वोदय प्रसंगी होणार आहे. या उत्सवाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून भाविक भक्त येतात. देऊळगाव राजा नगरीचे वैभव असणाऱ्या श्री बालाजी महाराजांचा उत्सव हा सर्व जाती धर्मातील भाविकांसाठी एक परवणी ठरतो.