तीन दिवस चालणार पलसिध्द महास्वामींचा स्मृती महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:08 PM2018-08-22T13:08:03+5:302018-08-22T13:08:39+5:30
साखरखेर्डा (बुलडाणा): विरशैव लिंगायत समाजाचे धर्म प्रचारक उज्जैयनी (कर्नाटक) पिठाचे जगद्गुरू श्री पलसिध्द महास्वामी यांचा ९६० वा स्मृती महोत्सव २९ ते ३१ आॅगस्ट रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील पलसिध्द मठात होणार आहे.
साखरखेर्डा (बुलडाणा): विरशैव लिंगायत समाजाचे धर्म प्रचारक उज्जैयनी (कर्नाटक) पिठाचे जगद्गुरू श्री पलसिध्द महास्वामी यांचा ९६० वा स्मृती महोत्सव २९ ते ३१ आॅगस्ट रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील पलसिध्द मठात होणार आहे. या महोत्सवासाठी ग्राम विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची ३० आॅगस्टला उपस्थिती राहणार आहे. साखरखेर्डा या नगरीतील अभय अरण्यात उज्जैयनी पिठाचे जगद्गुरू पलसिध्द महास्वामी धर्म प्रचार आणि प्रसार करीत असताना काही काळ येथे घालविला. अभय अरण्यातच एका वृक्षाखाली त्यांनी संजीवन समाधी घेतली. समाधी घेतेवेळी त्यांच्या हातातील पळसाचा दंड त्यांनी बाजुलाच उभा केला होता. त्या दंडकाला पालवी फुटून त्याचे पळसाच्या वृक्षात रूपांतर झाले. आजही ते वृक्ष समाधी स्थळी उभा आहे. या मठाची बांधणी तीन भागात झालेली आहे. तत्कालीन राजाने या मठाची स्थापणा केल्याची अख्यायीका आहे. महास्वामी यांच्या स्मृती महोत्सावानिमीत्त २९ आॅगस्टला सकाळी सहा वाजता प्रारंभ, दुपारी १२ वाजता शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार विधी होणार आहे. महोत्सवासाठी येणाºया दिंड्यांचे स्वागत मठाधिपती शिवाचार्यरत्न सद्गुरु सिध्दलिंग शिवाचार्य महाराज आणि मठाचे उत्तराधिकारी निलकंठ स्वामी करणार आहेत. दुपारी चार वाजता साखरखेर्डा नगरीतून पालखी मिरवणूक, रात्री आठ वाजता अंबादास महाराज यांचे कीर्तन होणार आहे. दुसºया दिवशी ३० आॅगस्ट रोजी सकाळी सहा वाजता एक्का समाप्ती, सात वाजता श्रींच्या मुर्तीस रुद्राभिषेक व महापुजा, सकाळी दहा वाजता नीलेश जंगम आणि मंदार जंगम यांचा भक्तीसंगिताचा कार्यक्रम होणार आहे. ११ वाजता वेदांतचार्य शिवाचार्यरत्न प्राप्त सद्गुरु सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली धर्म सभा होणार आहे. या धर्मसभेला डॉ.जितेंद्र बिरासदार, डॉ.शे.दे. पसारकर मार्गदर्शन करणार आहेत. चार वाजता महाप्रसाद, रात्री आठ वाजता सोनबा गुरुजी शिराळे यांचे कीर्तन, रात्री दहा वाजता भारुडकार निरंजन भाकडे यांच्या भारुडाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. गुरुवार, ३१ आॅगस्टला गुरुवर्यांचे अशिर्वचन आणि दैयनंदिन कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होईल, अशी माहीती चिखली अर्बण बँकेचे संचालक तथा संस्थानचे विश्वस्त विश्वनाथअप्पा जितकर, उत्तराधिकारी निलकंठ स्वामी, मापारी यांनी दिली आहे. (वार्ताहर)