नवीन बँक खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक!
By admin | Published: March 6, 2017 01:52 AM2017-03-06T01:52:08+5:302017-03-06T01:52:08+5:30
पॅनकार्डसाठी आता ग्रामपातळीवर जनजागृती.
बुलडाणा, दि. ५- कोणत्याही बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड नंबर आवश्यक राहील, असे रिझर्व्ह बँक ऑफ इडियाने जाहीर केले आहे. याबाबत ग्रामीण नागरिक व शेतकर्यांना माहिती व्हावी, यासाठी ग्रामीण भागात दवंडी देऊन जागृती करण्याचे काम जिल्ह्यात सुरु आहे.
नोटाबंदीनंतर नागरिकांच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आली. आता बँकेतील आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी नवीन बँक खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड नंबर बंधनकारक केला आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून १५ डिसेंबर २0१६ रोजी आदेश काढण्यात आला. त्याची अंमलबजावणी २८ फेब्रुवारी २0१७ पासून सर्वत्र सुरु करण्यात आली आहे.
बँक खात्याला आधारकार्ड लिंक करण्याच्या धर्तीवर सदर उपाययोजना करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांमध्ये याबाबत जागृती आहे, मात्र, ग्रामीण भागात विशेषत: शेतकर्यांपर्यंंंंत ही माहिती पोहोचावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तराहून पॅनकार्ड शिबिराचे आयोजन करुन तशी दवंडी गावात देण्याचे काम जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु करण्यात आले आहे.
शेतकर्यांसाठी उपयुक्त निर्णय
नोटाबंदीनंतर शेतकर्यांना आपल्या शेतमालाचा पैसा हा धनादेशाद्वारे देण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सदर धनादेश वटविण्यासाठी पॅनकार्ड नंबरची मागणी केली जाते. या निर्णयानंतर शेतकर्यांच्या आर्थिक व्यवहारातील अडचणी दूर होऊन सुलभता येईल.
सदर निर्णयाची अंमलबजावणी २८ फेब्रुवारीपासून सर्वच बँकांमध्ये सुरू करण्यात आली आहे. नवीन खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक केले आहे. शिवाय जुन्या बँक खातेदारांकडूनही पॅनकार्ड नंबर मागितले जात आहेत.
-विलास बावसकर
बँक व्यवस्थापक,
बँक ऑफ इंडिया, बुलडाणा