पंचायत समिती सभापती, ग्रामसेवकांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2017 12:44 AM2017-05-25T00:44:43+5:302017-05-25T00:44:43+5:30
भिवगाव बु. गावातील महिला पाण्यासाठी आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा : गावातील पाणीटंचाई दूर करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील भिवगाव बु. येथील महिलांनी देऊळगाव राजा पंचायत समिती सभापती व ग्रामसेवकास २४ मे रोजी घेराव घालून आंदोलन केले.
देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगाव बु. गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई असल्याने येथील महिलांना, नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावासाठी दोन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत, तर गावात १५ दिवस नळाला पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासाठी २४ मे रोजी दुपारी स्थानिक पंचायत समिती सभापती दालनात पंचायत समिती सभापती रजनी चित्ते आणि ग्रामसेवक शारदा नवले यांना घेराव घातला आणि जोपर्यंत गावातील पाण्याची समस्या सुटणार नाही, संबंधित दोषी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी महिलांनी केली आहे.
यापूर्वी २७ मार्च रोजी स्थानिक पंचायत समिती परिसरात सरंपच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने प्रत्येक गावास पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी प्रत्येक गावाचे सरपंच आणि ग्रामसेवकाला पाण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यासाठी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने भिवगाव बु. येथील पाण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या दोन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. तरीही १५ दिवस नळाला पाणी येत नाही. तसेच सरंपच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. शेवटी भिवगाव बु. येथील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत घेराव आंदोलन करून निवेदन दिले. यावेळी स्वभिमानी शेतकरी संघटनाचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी रीतसर चर्चा करून त्वरित भिवगाव बु. येथे पिण्याच्या पाणीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. यावेळी शीला गोळे, कासिंदा मुळे, सविता मुळे, सारिका शिंदे, तुळसाबाई कामठे, वच्छलाबाई निकाळजे, इंदूबाई घाडगे, रमा मुळे, विमल मुळे आदी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.