बुलढाणा जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण
By ब्रह्मानंद जाधव | Published: March 23, 2023 05:02 PM2023-03-23T17:02:27+5:302023-03-23T17:02:41+5:30
जिल्ह्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुलढाणा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून २ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे २३ मार्च रोजी पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल २४ मार्च रोजी शासनास सादर होणार आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा पिकाला पावसाचा फटका बसला. मका, रब्बी ज्वारी पीक वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाले. बिजोत्पादनाच्या कांदा पिकासह भाजीपाला वर्गीय पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता रब्बी पीक विम्याची आशा लागली आहे. या पावसाने २ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले असून, २४ मार्च पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर हाेणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी दिली आहे.