लोणार सरोवरात आढळली पांडवा अरुणी कोळीची प्रजाती!
By admin | Published: May 30, 2017 01:02 AM2017-05-30T01:02:02+5:302017-05-30T01:02:02+5:30
जगातील एकमेव दुर्मीळ प्रजाती
किशोर मापारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : लोणार येथे उल्का पडल्यामुळे निर्माण झालेल्या लोणार सरोवराचे नाव जगात पसरलेले आहे; मात्र यामध्ये पुन्हा या सरोवरामध्ये कोळी या प्रजातीचा ‘पांडवा अरूणी’ ही प्रणाली असल्याचे संशोधनामध्ये उघड झाले असून, जगातील ही एकमेव प्रजाती लोणार सरोवरामध्ये आढळली आहे.
लोणार सरोवर येथे गेल्या २०१२ पासून दर्यापूर येथील डॉ.अतुल बोडखे हे श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालीत जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय दर्यापूर येथील कोळी संशोधन प्रयोग शाळेत डी.एस.टी. भारत सरकार अंतर्गत कोळ्याचा अभ्यास सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण कोळ्याच्या ३४ कुळाचा शोध डॉ.अतुल बोडखे व त्यांच्या टिमने केलेला आहे. यापैकी काही कोळ्याची भारतात प्रथमच नोंद झालेली आहे, तर काही जगासाठी नवीन कोळी या सरोवरामध्ये आढळून आलेले आहे. यामध्ये नुकतेच २०१३ मध्ये लोणार सरोवरातील गवताळ भागात एक नवीन कोळी प्रजाती आढळून आली. या कोळ्यावर संशोक्त प्रयोगशाळा जे.डी.पाटील सांगळुदकर महाविद्यालय दर्यापूर येथे डॉ. अतुल बोडखे, डॉ. वीरेंद्र प्रताप, कनियाल, शास्त्रज्ञ, भारतीय वन्य जीव संस्था देहरादून, सुभाष कांबळे, श्रीपात मथेन, डॉ. गजानन सताप व डॉ. महेश चिखले यांनी संशोधन केल्यानंतर सन २०१६ ला या कोळ्यावर संशोधन पत्रिका तयार करून आफ्रिकेतील नामवंत शास्त्रज्ञ जर्नल सर्किट यांच्याकडे पुढील संशोधनासाठी पाठविण्यात आला. संशोधनाचे एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा कोळी जगातील नवीन प्रणाली असल्याचे सिद्ध झाले.
जगात नवीन कोळ्याच्या यादीत ‘पांडवा अरूणी’ या कोळ्याचा नुकताच शोध लागलेला आहे. हा कोळी टायटोनीसीडी या कोळ्याच्या कुळातील असून, या कुळाचा शोध १९६७ मध्ये लेटमिन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. या प्रजातीला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरूण शेळके यांचे नाव देण्यात आलेले आहे. ही प्रजाती जगभर पांडवा अरूणी या नावाने ओळखल्या जाईल, या कुळातील पांडवा नावाच्या एकूण ५३ प्रजाती जगभर आढळतात. यापैकी एकूण ६ प्रजाती भारतात आढळतात. त्याचप्रमाणे चीन, तंझानिया, केनिया, मडागास्कर, श्रीलंका, व्युगेनिया, जर्मनी, हंगेरी, मॅनमार, थायलंड व पाकिस्तान या देशामध्ये नोंद झालेली आहे; मात्र लोणार सरोवरामध्ये सापडलेल्या या प्रजातीची नोंद नुकतीच झाली आहे. भारतामध्ये सहा जातीचे पांडवा कोळी आढळून येतात. यामध्ये पांडवा शिवा, पांडवा गणेशा, पांडवा कामा, पांडवा गंगा, पांडवा सरस्वती, पांडवा अद्रका इत्यादी प्रजाती भारतात आढळून येतात. लोणार सरोवराने पांडवा अरूणी या कोळ्याच्या नवीन प्रजातीचा शोध लागल्यामुळे लोणारची ख्याती अधिकच वाढली आहे.
पांडवा अरूणी कोळ्याची ओळख
हा कोळी निशाचर असून, हा प्राणी लहान गवतात आढळतो. रात्रीच्या वेळेला हा प्राणी गवतातील कीटकांना मारून गवताची वाढ होण्यास मदत करतो. तसेच मातीची पोत सुधारण्यासाठीसुद्धा हा कोळी उपयुक्त ठरतो. या कोळ्याची लांबी ५.९ मिमी असून, लाल, पिवळसर रंगाचा हा असतो. पांडवा अरूणी या कोळ्याला आठ डोळे असतात व ते पांढऱ्या रंगाचे असतात. अशा प्रकारचा हा कोळी लोणार सरोवरात आढळून आला असून, तो कोळी जगात इतर कोठेही नसल्याचे आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे.