दोन वर्षांपासून ‘पंढरपूर स्पेशल’ रेल्वेगाडी रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 10:58 AM2021-07-20T10:58:54+5:302021-07-20T10:59:19+5:30
'Pandharpur Special' train canceled for two years : सलग दुसऱ्या वर्षी आषाढीत पंढरपूर रेल्वे रद्द करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : आषाढी एकादशीच्या पर्वावर दरवर्षी खामगाव ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या प्रकोपाने सलग दुसऱ्या वर्षी आषाढीत पंढरपूर रेल्वे रद्द करण्यात आली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनालाही लाखोंचा फटका बसला आहे. तसेच भाविकांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पंढरपूर यात्रा ही विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी असते. मिळेल त्या वाहनाने वारकरी पंढरपूर गाठतात आणि विठ्ठलाचे मनोभावे दर्शन करून परत येतात. संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वरांपासून तर आजतागायत ७५० वर्षांपासून वारीची पंरपरा चालत आली आहे. यापूर्वी प्लेगची महामारी आली. मात्र, प्रशासनामध्येच एवढी जनजागृती नसल्याने त्यावेळीही वारी अव्याहत पार पडली. तथापि, दीड वर्षामध्ये कोरोना संसर्गाने यात्रा रद्द झाल्या आणि मंदिरांची कुलूपे उघडली गेली नव्हती. यंदा पंढरपूर येथे पालख्या एसटी बसने पाठविण्यात आल्या आहेत. भक्तांची गर्दी होणार नाही, याची काळजी शासन घेत आहे. त्यामुळे यात्रा भरणार नाही. एसटी बसही पंढरपूर यात्रेच्या अनुषंगाने धावण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे रेल्वे प्रशासनाने पंढरपूर विशेष रेल्वे रद्दचा निर्णय घेतला आहे. खामगाव रेल्वे स्थानकातून प्रवासी रेल्वे धावत नाहीत. केवळ मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे धावतात. मात्र, भाविकांसाठी पंढरपूर रेल्वे सुरू करण्यात आली होती. दरवर्षी आषाढीला पंढरपूरला जात होती.
रेल्वे प्रवासाने विठुरायाचे दर्शन अल्प खर्चात
पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी, शेतकरी आणि सामान्यांना रेल्वे गाडीचा प्रवासच परवडणारा आहे. रेल्वे गाडीचा सुखकर प्रवास असतो. कमी खर्चात पंढरीत वि्ठ्ठलाचे दर्शन घेता येते. मात्र, यावर्षी मंदिर बंद असल्याने भाविकांच्या आनंदावर विरजण पडले असल्याच्या प्रतिक्रिया भक्तांनी दिल्या आहेत.