पर्वतरांगेच्या कुशीतील पैनगंगा नदीचे उगमस्थान धोक्यात!
By admin | Published: May 20, 2017 01:34 PM2017-05-20T13:34:04+5:302017-05-20T13:34:04+5:30
अजिंठा पर्वतरांगेच्या कुशीत असलेल्या पैनगंगा नदीचे उगमस्थानसध्या शेवटची घटका मोजत आहे.
ब्रम्हानंद जाधव
उगमस्थान दुर्लक्षीत : उगमस्थानाची साक्ष देणा-या वास्तूला लोखंडी खांबाचा आधार
बुलडाणा : अजिंठा पर्वतरांगेच्या कुशीत असलेल्या पैनगंगा नदीचे उगमस्थान
सध्या शेवटची घटका मोजत आहे. या नदीच्या उगमस्थानाची साक्ष देणारे
हेमाडपंथी बुधनेश्वर मंदिराच्या ऐतिहासिक नक्षीकाम केलेल्या दगडी
खांबाची पडझड झाली असल्यामुळे हे ऐतिहासिक मंदिर सध्या लोखंडी खांबाच्या
आधारावर तग धरून आहे. नदीचे उगमस्थान ढासाळले असल्याने ऐतिहासिक वास्तू
धोक्यात सापडली आहे.
विदर्भाच्या नद्यांचा उल्लेख पौराणीक साहित्यामध्ये आलेला असून,
त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून वाहत असलेल्या पैनगंगा या नदीचाही विशेष
उल्ल्ेख असल्याने पैनगंगा नदीला पौराणिक महत्व प्राप्त आहे. बुलडाणा
जिल्ह्याच्या पश्चिम सिमेवरुन चिखली-बुलडाणा पठारात उगम पावनारी पैनगंगा
नंदी ४८० किमी वाहत जाऊन चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्गुस जवळ वर्धा नदीला
मिळते. अजिंठा पर्वतरांगेत आग्नेय उतारावर पैनगंगा नदीचा उगम होतो.
पैनगंगा ही नदी बुलडाणा व यवतमाळ पठारावरुन पूर्वेकडे वाहत जाते आणि
यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर येथे वर्धा नदीला पैनगंगा मिळते.
पैनगंगा नदीही वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांच्या दक्षिण सीमा आहेत. पैनगंगा
नदीला उजव्या किनाऱ्याने कयाधू तर डाव्या किनाऱ्याने पूस, अडाण, आरणा,
वाघाडी, खुनी या उपनद्या मिळतात. तसेच या नदीवर धरणे बांधून शेतीचा
विकास झालेला आहे. देउळघाट, वणी, पुसद, पांढरकवडा, चिखली, मेहेकर ही शहरे
पैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहेत. मात्र, सध्या या पैनगंगा नदीचे उगमस्थान
धोक्यात सापडले आहे. सर्वत्र नदी खोलीकरणाची मोहिम राबविण्यात येत असताना
नदीच्या उगमस्थानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उगमस्थानाच्या
ठिकाणाहून दुरपर्यंत पैनगंगा नदीचे पात्र बुजत चालले आहे. या नदी
पात्रावर काही ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. उगमस्थान जमीन दोस्त होत
असून, काही दिवसांनी या उगमस्थानाची ओळखही याठिकाणाहून पुसल्या जाण्याची
भिती व्यक्त होत आहे. उगमस्थानाची साक्ष देणाऱ्या मढ येथील हेमाडपंथी
बुधनेश्वर मंदिराची दुरवस्था झाली आहे. या हेमाडपंथी मंदिराचे नक्षीदार
दगडी खांब तुटल्याने ऐतिहासिक वास्तूवर अवकळा आल्याचे दिसून येते.
नक्षीदार स्तंभ झाले भग्न
पैनगंगा नदीच्या उगमस्थानावर इ.स.१६३९ साली स्थापन झालेले हेमाडपंथी
बुधनेश्वर मंदिर हे अनेक छोट्या-छोट्या मुर्त्यां, नक्षीदार खांब, सुबक
कोरीव दगडांपासून बनवले होते. परंतू सध्या याठिकाणी असलेले अनेक नक्षीदार
स्तंभ भग्न झालेले दिसून येतात. मंदिराच्या खांबावरील दगडी नक्षीकाम
कमालीचं देखणं आहे. मात्र मंदिराच्या या देखण्या खांबाची पडझड झाल्याने
अनेक खांब पैनगंगा नदीच्या उगमस्थानाच्या खोऱ्यात इतरत्र पडलेले दिसतात.