पैनगंगा नदीचे उगमस्थान धोक्यात!

By Admin | Published: May 22, 2017 12:36 AM2017-05-22T00:36:29+5:302017-05-22T00:36:29+5:30

उगमस्थान दुर्लक्षित : उगमस्थानाची साक्ष देणाऱ्या वास्तूला लोखंडी खांबाचा आधार

Panganga river in danger! | पैनगंगा नदीचे उगमस्थान धोक्यात!

पैनगंगा नदीचे उगमस्थान धोक्यात!

googlenewsNext

ब्रह्मानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अजिंठा पर्वतरांगेच्या कुशीत असलेल्या पैनगंगा नदीचे उगमस्थान सध्या शेवटची घटका मोजत आहे. या नदीच्या उगमस्थानाची साक्ष देणारे हेमाडपंती बुधनेश्वर मंदिराच्या ऐतिहासिक नक्षीकाम केलेल्या दगडी खांबाची पडझड झाली असल्यामुळे हे ऐतिहासिक मंदिर सध्या लोखंडी खांबाच्या आधारावर तग धरून आहे. नदीचे उगमस्थान ढासाळले असल्याने ऐतिहासिक वास्तू धोक्यात सापडली आहे.
विदर्भाच्या नद्यांचा उल्लेख पौराणिक साहित्यामध्ये आलेला असून, त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून वाहत असलेल्या पैनगंगा या नदीचाही विशेष उल्लेख असल्याने पैनगंगा नदीला पौराणिक महत्त्व प्राप्त आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून चिखली-बुलडाणा पठारात उगम पावणारी पैनगंगा नदी ४८० किमी वाहत जाऊन चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसजवळ वर्धा नदीला मिळते. अजिंठा पर्वतरांगेत आग्नेय उतारावर पैनगंगा नदीचा उगम होतो. पैनगंगा ही नदी बुलडाणा व यवतमाळ पठारावरुन पूर्वेकडे वाहत जाते आणि यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर येथे वर्धा नदीला पैनगंगा मिळते. पैनगंगा नदीही वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांच्या दक्षिण सीमा आहेत. पैनगंगा नदीला उजव्या किनाऱ्याने कयाधू तर डाव्या किनाऱ्याने पूस, अडाण, आरणा, वाघाडी, खुनी या उपनद्या मिळतात. तसेच या नदीवर धरणे बांधून शेतीचा विकास झालेला आहे. देऊळघाट, वणी, पुसद, पांढरकवडा, चिखली, मेहेकर ही शहरे पैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहेत. मात्र, सध्या या पैनगंगा नदीचे उगमस्थान धोक्यात सापडले आहे. सर्वत्र नदी खोलीकरणाची मोहीम राबविण्यात येत असताना नदीच्या उगमस्थानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उगमस्थानाच्या ठिकाणाहून दूरपर्यंत पैनगंगा नदीचे पात्र बुजत चालले आहे. या नदी पात्रावर काही ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. उगमस्थान जमीनदोस्त होत असून, काही दिवसांनी या उगमस्थानाची ओळखही याठिकाणाहून पुसल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

नक्षीदार स्तंभ झाले भग्न
पैनगंगा नदीच्या उगमस्थानावर इ.स.१६३९ साली स्थापन झालेले हेमाडपंती बुधनेश्वर मंदिर हे अनेक छोट्या-छोट्या मूर्तीं, नक्षीदार खांब, सुबक कोरीव दगडांपासून बनवले होते. परंतु सध्या या ठिकाणी असलेले अनेक नक्षीदार स्तंभ भग्न झालेले दिसून येतात. मंदिराच्या खांबावरील दगडी नक्षीकाम कमालीचं देखणं आहे. मात्र मंदिराच्या या देखण्या खांबाची पडझड झाल्याने अनेक खांब पैनगंगा नदीच्या उगमस्थानाच्या खोऱ्यात इतरत्र पडलेले दिसतात.

उगमस्थानातील ऐतिहासिक मूर्ती मोडकळीस
पैनगंगा नदीच्या उगमस्थानाच्या आसपासचा परिसर हा प्राचीन अवशेषांनी अगदी वेढलेला आहे. उगमस्थानाच्या आसपास कित्येक आकर्षक मूर्ती पाहावयास मिळतात. परंतु दगडावर कोरलेल्या ह्या ऐतिहासिक मूर्ती सध्या मोडकळीस आल्या आहेत. या मूर्ती उगमस्थानात अनेक ठिकाणी पडलेल्या असून, पौराणिक-धार्मिक-ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या आहेत. तरीसुद्धा काही अजूनही शाबूत असणाऱ्या पण मूळचे सौंदर्य हरवलेल्या मूर्ती याठिकाणी सापडतात.

Web Title: Panganga river in danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.