पैनगंगा नदीला पुर; बुलडाणा-चिखली मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:08 AM2020-09-21T11:08:11+5:302020-09-21T11:08:30+5:30
बुलडाणा शहरानजीकच्या पैनगंगा नदीला पुर आल्यामुळे बुलडाणा-चिखली मार्ग सोमवारी सकाळ पासून बंद आहे.
बुलडाणा: परतीच्या पावसाचे वेध लागलेले असतानाच बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली असून २० सप्टेंबर रोजी रात्री पडलेल्या पावसामुळे सिंदखेड राजासह संग्रामपूर तालुक्यात नुकसान झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान बुलडाणा शहरानजीकच्या पैनगंगा नदीला पुर आल्यामुळे बुलडाणा-चिखली मार्ग सोमवारी सकाळ पासून बंद आहे. वृत्त लिहीपर्यंत हा मार्ग सुरू झाला नव्हता.
दुसरीकडे सोमवारी सकाली आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २९.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस हा सिंदखेड राजा तालुक्यात झाला असून ७० मिमी एवढी या पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल संग्रामपूर तालुक्यात ५५ मिमी, मेगर तालुक्यात ४२ मिमी, बुलडाणा तालुक्यात २७, चिखली तालुक्यात २०, देऊळगाव राजा २०, लोणार ३३, नांदुरा २७, मलकापूर २१ मिमी या प्रमाणे पाऊस झाला आहे.
या दमदार पावसामुळे पैनगंगा नदीला पुर आला असून बुलडाणा शहरानजीक येळगाव येथील पुल पाण्याखाली गेल्याने सोमवारी सकाळपासून हा मार्ग बंद आहे. सकाळी दहा वाजेच्या सुमारास पुराचे पाणी वाढल्याने हा पुल पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात येत आहे. दुपार पर्यंत पुराचे पाणी उतरल्यास बुलडाणा-चिखली मार्ग पुर्ववत सुरू होवू शकतो.
दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली
सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही ८८ टक्क्यावर पोहोचली असून दोन तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यात वार्षिक सरारीच्या १०२ मिमी तर मलकापूर तालुक्यात १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संग्रामपूर तालुक्याची सरासरी ९९ टक्क्यावर तर चिखली तालुक्याची सरासरी ही ९८ टक्क्यांवर पोहोचली आहे. येत्या दोन दिवसात असाच पाऊस पडत राहिल्यास १३ तालुक्यांपैकी आठ तालुके पावसाची वार्षिक सरासरी ओलांडू शकतात.