हवामान बदलामुळे पानमळा उत्पादक शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:34 AM2021-04-01T04:34:57+5:302021-04-01T04:34:57+5:30
कधीकाळी पानवेलीच्या उत्पादनात सर्वांत पुढे असलेल्या मासरूळ परिसरातील शेतकरी हळूहळू इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत. पानवेलीला शासनाने विमा संरक्षण ...
कधीकाळी पानवेलीच्या उत्पादनात सर्वांत पुढे असलेल्या मासरूळ परिसरातील शेतकरी हळूहळू इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत. पानवेलीला शासनाने विमा संरक्षण द्यावे, यासाठी वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पानमळे जगविण्यासाठी हे शेतकऱ्यासाठी फार जोखमीचे झालेले असतानासुद्धा काही शेतकरी परंपरागत व्यवसाय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मासरूळ, धामणगाव, पारद, वालसावंगी परिसरात तीनशे ते चारशे पानमळे होते. मात्र, आता फक्त ७० ते ८० पानमळे याठिकाणी जिवंत आहेत. त्यांचेसुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने पान उत्पादन करणे थांबवावे का, या विचाराने शेतकऱ्यांना पछाडले आहे.
पान उत्पादन करणे अत्यंत कठीण आहे. शेतकरी अनंत अडचणींचा सामना करून पान उत्पादन घेत आहेत. मात्र, पान उत्पादनाबाबत शासनाचे उदासीन धोरण दिसून येते. वादळ, वारा, गारपीट यापासून पानमळा संरक्षण करण्यासंदर्भात शासनाने ठोस धोरण अंमलबजावणी करण्याची गरज आहे. पानवेलीचा फळ उत्पादनामध्ये समावेश करावा.
-दिलीप सिनकर, पंचायत समिती सदस्य, बुलडाणा
इतर पिकांना विमा कवच प्रदान केले जाते. त्याचप्रमाणे पानवेलींनासुद्धा विमा कवच द्यावे, ही रास्त मागणी या शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना तात्काळ विमा कवच व वार्षिक अनुदान देण्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत, नसता शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलनासाठी आम्ही सक्रिय राहू.
-शेषराव किसन सावळे, माजी सरपंच, मासरूळ
पान उत्पादन हा परंपरागत व्यवसाय असून, याला चालना देण्याच्या दृष्टीने शासनाने मदत करावी. पीक विमा कवच देण्याची गरज आहे. भविष्यात पानमळे जिवंत पाहण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
-संदीप काटोले, मासरूळ