पालकांनो, पोस्ट कोविडच्या मुलांना जपा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:13 AM2021-09-02T05:13:17+5:302021-09-02T05:13:17+5:30
बुलडाणा : मागील दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. आता दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती अजून ...
बुलडाणा : मागील दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. आता दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती अजून गेलेली नाही. त्यातच आता लहान मुलांना तापजन्य आजारांची लक्षणे दिसू लागल्याने पालकांसाठी हे काळजीचे कारण बनले आहे. यंदाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलेदेखील बाधित झाली. कोरोनातून बरे झाल्यानंतर ही मुले ठणठणीत झाली असली तरी बदलत्या हवामानानुसार या मुलांमध्ये साथीच्या आजारांसह कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत.
शहरातील विविध बालरुग्णालयांमध्ये अशा प्रकारचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनातून बरे झालेल्या मुलांना जपण्याचे आवाहन पालकांना करण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास, तत्काळ डॉक्टरांना दाखविण्याचे सुचविले जात आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातील बालरोगतज्ज्ञांकडे उपचारासाठी बालकांची संख्या वाढली आहे. त्यात कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये पुन्हा कोरोनासारखी लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे पालकांना काहीशी भीती वाटत असली तरी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या मुलांवर उपचार केल्यास दोन-तीन दिवसांत ती बरी होत असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे मत आहे.
लक्षणे दिसल्यास योग्य ती काळजी घ्या
वय १५ वर्षांखालील वयोगटात कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. कोरोना होऊन गेलेल्या बहुतांश मुलांच्या पालकांनी या संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानानुसार होत असलेल्या आजारांमुळे पालकांनी न घाबरता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
................बॉक्स..............
या लक्षणांकडे असू द्या लक्ष
सतत खोकला येणे, ताप येणे, धाप लागणे, जोराने श्वास घेणे, अशक्तपणा जाणवणे, आदी लक्षणे कोरोनानंतर आढळून येत आहेत. ही लक्षणे कायम राहिल्यास कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
...............बॉक्स............
बालरोगतज्ज्ञ म्हणतात
बालकांमध्ये आता खोकला येणे, ताप येणे, धाप लागणे, जुलाब होणे ही सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येतात. मात्र, पालकांनी तत्काळ उपचार करून घेतले तर दोन ते तीन दिवसांत मुले बरी होतात. परंतु, हीच लक्षणे जास्त काळ राहिली तर पालकांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या तत्काळ करून पुढील उपचार करावेत.
-डॉ. हेमंत बुंदे, बालरोगतज्ज्ञ
...................................................