शालेय साहित्यांसाठी पालकांची दमछाक
By admin | Published: July 3, 2017 12:43 AM2017-07-03T00:43:43+5:302017-07-03T01:10:40+5:30
खरेदीसाठी बाजारात गर्दी : वाढत्या किमतीमुळे पालकांच्या खिशाला झळ
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शाळेची पहिली घंटा आता वाजली आहे. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्याने वर्षभरासाठी विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, वह्या, स्कूल बॅग, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात विद्यार्थी व पालकवर्गाची गर्दी दिसून येत आहे. या दहा ते पंधरा दिवसात बाजारात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. अनेक पालकांना शक्य नसतानाही आपल्या पाल्याच्या शिक्षणात अडथळा नको म्हणून ते पैशांची तजवीज करताना दिसत आहेत.
मार्च, एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर दोन महिन्यांपासून शैक्षणिक संस्थांना सुट्या होत्या. या दरम्यान शाळा, महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला होता. साधारणत: दरवर्षी २६ जूनपासूनच शाळांचे नवीन सत्र सुरू होते. यावर्षी २६ जूनला रमजान ईदची सुटी आल्याने २७ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. शासनाच्या धोरणानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. तसेच अनुदानित शाळेत सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे. पुस्तके शाळेतूनच मिळत असल्याने बाजारात पुस्तकांशिवाय वह्या, स्कूल बॅग, गणवेश आणि इतर साहित्यासाठी जावेच लागते. त्यामुळे बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत.
शाळा उघडण्याच्या आठ दिवसांपूर्वीच शहरातील प्रमुख शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांकडून तयारी सुरू करण्यात आली होती. सध्या सकाळपासूनच या दुकानांमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी दिसून येत आहे. सायंकाळपर्यंत सर्वच दुकाने पालकांच्या गर्दीने फुललेली असतात. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके शाळेतूनच उपलब्ध होत आहे; परंतु गणवेश, स्कूल बॅग व इतर सर्व साहित्यांसह आपला बालक शाळेत जावा, अशी सर्व पालकांची अपेक्षा असते. त्यामुळे ते बाजारात गर्दी करतात. यावर्षी विविध कंपन्यांचे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे; परंतु किमती वाढल्याने पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.
खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी डोनेशन देऊन उरलेला पैसा शालेय साहित्याच्या महागड्या खरेदीवर खर्च होत असल्याने जून महिना पालकांसाठी सर्वाधिक खर्चाचा ठरत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती याहीपेक्षा बिकट आहे. पेरणीसाठी बियाणे खरेदी करण्याच्या दृष्टीने पैशांची तडजोड करावी की मुलांच्या शिक्षणाची सोय करावी, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी सापडला आहे. यावर्षी जवळपास सर्वच शैक्षणिक वस्तूंच्या किमतीमध्ये दहा ते पंधरा टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यात पालकांची ओढताण होत असली तरी मुलांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारची कसर राहू नये, यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहे.
ठरावीक ठिकाणी शैक्षणिक साहित्य उपलब्ध
शहरात मराठीसोबतच आता इंग्रजी माध्यमांच्या शाळाही मोठ्या प्रमाणात आहे. यातच सर्व शाळांचे गणवेश वेगवेगळ्या रंगाचे आहेत. त्यामुळे ठरावीक शाळांचे ठरावीक दुकानांमध्येच गणवेश उपलब्ध आहे. शाळेतर्फेच पालकांना गणवेश कुठे मिळतील, याबाबत सूचना केल्या जातात. त्यामुळे अशा दुकानांमध्ये पालकांची झुंबड उडत आहे.
खासगी शाळांचे भरमसाट डोनेशन
गेल्या काही वर्षांमध्ये खासगी कॉन्व्हेंटकडे पालकांचा कल वाढला आहे. प्रत्येक जण आपल्या पाल्याला अशा शाळांमध्ये टाकत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात डोनेशन व त्यानंतर महिन्याची फी, संगणक व इतर विविध नावांनी हजारो रुपये पालकांना भरावे लागत आहे. ऐपत नसली तरी शिक्षणाच्या ओढीमुळे पालक पैशांची तरतूद करतात.