आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, जागा २७ हजार, अर्ज केवळ ९८१
By दिनेश पठाडे | Updated: April 30, 2024 15:39 IST2024-04-30T15:39:03+5:302024-04-30T15:39:17+5:30
इंग्रजी शाळेचे ऑप्शन येत नसल्यामुळे प्रतिसाद मिळेना

आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, जागा २७ हजार, अर्ज केवळ ९८१
बुलढाणा : आरटीई अंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इंग्रजी शाळेत प्रवेशाची गॅरंटी नसल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज करण्यास अनुत्सुकता दाखवली आहे. परिणामी १६ ते ३० एप्रिलच्या कालावधीत केवळ ९८१ अर्ज प्राप्त झाले आहेत.
शिक्षण हक्क कायद्याने मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. मात्र, यंदा प्रथमच आरटीईच्या निकषात बदल केले असून, त्यानुसार एक किमीच्या अंतरावर अनुदानित/सरकारी शाळा उपलब्ध असल्यास स्वयंअर्थसाहाय्यित खासगी शाळा संकेतस्थळावर दिसत नाही. मोफत प्रवेशासाठी बुलढाणा जिल्ह्यात २७ हजार ८५२ जागा राखीव असतानाही त्या तुलनेत अर्ज प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे.
अलीकडच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा ओढा वाढला आहे. त्यामुळे गतवर्षापर्यंत आरटीईच्या प्रवेशासाठी अर्ज मोठ्या प्रमाणात येत होते. यंदा मात्र, शासकीय आणि अनुदानित शाळांमध्येच प्राधान्याने प्रवेश दिला जाणार असल्याने पालकांनी त्याऐवजी इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याच्या उद्देशाने आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज करण्याचे टाळले आहे.