पार्किंगअभावी शेगावात वाहतुकीची कोंडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:11 AM2017-08-05T00:11:41+5:302017-08-05T00:12:30+5:30
शेगाव : दररोज गजानन महाराज मंदिर परिसरात पार्किंग नसल्याने आणि रस्त्यावर केल्या जाणार्या दुचाकी, ऑटो पार्किंगला शिस्त नसल्याने वाहतुकीची कोंडी पहावयास मिळते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : दररोज गजानन महाराज मंदिर परिसरात पार्किंग नसल्याने आणि रस्त्यावर केल्या जाणार्या दुचाकी, ऑटो पार्किंगला शिस्त नसल्याने वाहतुकीची कोंडी पहावयास मिळते.
मंदिर परिसर, आंबेडकर चौक या ठिकाणी दररोज आपल्याला वाहतुकीची कोंडी होत असताना दिसते, तर गुरुवार, एकादशी, उत्सव वा सुटीच्या दिवशी तर या परिसरात भविकांना आणि सामान्य माणसाला चालणेदेखील कठीण होते. शेगाव शहर आणि संत गजानन महाराज मंदिर परिसरात अशी परिस्थिती नेहमीचीच झाली असून, वाहतूक पोलीस हे फक्त त्या ठिकाणी बघ्याचा भूमिका बजवताना दिसतात. यालाच जर थोडी शिस्त लावली, तर हे प्रकार थांबतात; परंतु याकडे वाहतूक शाखेकडून कानाडोळा केल्या जात आहे. या परिसरात दुचाकी पार्किंगसाठी विशिष्ट पद्धतीने आखणी करून दिल्यास आणि काही दिवस त्या ठिकाणी वाहतूक पोलिसाची ड्युटी लावल्यास वाहतुकीला आणि बेशिस्त पार्किंग व्यवस्थेला वळण लागणे सहज शक्य आहे. मात्र, वाहतूक शाखेकडून याकडे सपशेल दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दिसून येते.
दर्शनासाठी येणार्या भाविकांची कोंडी!
संत गजानन महाराज मंदिर परिसरात येणार्या भाविकांना बेशिस् त वाहतुकीसोबतच अस्ताव्यस्त पार्किंगचाही फटका बसत आहे. सोबतच मंदिर परिसरातील विक्रेत्यांच्या दुकानांसमोरच ही वाहने उभी केली जात असल्याने, व्यावसायिकांसाठीही पार्किंग डोकेदुखी बनली आहे.