कोविडच्या नियंत्रणासाठी ‘मी जबाबदार’ अभियानात सहभागी व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:35 AM2021-03-17T04:35:06+5:302021-03-17T04:35:06+5:30
बुलडाणा : सध्या कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोविड विरूद्ध लढण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे किंवा सॅनिटाईज ...
बुलडाणा : सध्या कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोविड विरूद्ध लढण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे किंवा सॅनिटाईज करणे, फिजिकल डिस्टसिंग पाळणे या त्रि सुत्रींचा उपयोग करावा. त्यासाठी राज्य शासनाने मी जबाबदार अभियान हाती घेतले आहे. या अभियानात सहभागी होत सर्वांनी कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणाच्या जिल्हा कार्यक्रम सल्लागार समितीची सभा १५ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक सुनिल पाटील, भारत स्काऊट जिल्हा संघटक सुभाष आठवले, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्ञानोबा कांदे, जिल्हा आरोग्य विभागाचे ए.सि.शिरसाट, जिल्हा क्रीडा कार्यालयातील सुरेशचंद्र मोरे, जिल्हा कौशल्य विकास विभागातील एन.ई.पडघान, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखा व कार्यक्रम सहाय्यक अजयसिंग राजपूत व स्वयंसेवक सपना मोरे हे उपस्थित होते.
या सभेत वर्ष २०२०-२१ मधील आयोजित कार्यक्रमाची माहिती जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी दिली. तसेच कोविड-१९, कॅच द रेन आणि ग्रीन व्हीलेज-क्लीन व्हीलेज जनजागृती अभियान पथनाटयाच्या माध्यमातून जिल्हयात आयोजित केले असल्याचे सांगितले. शेवटी सर्व उपस्थितांचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांनी आभार मानले.