पॅसेंजर बंद : जिल्ह्यातील पाच रेल्वेस्थानकांवर अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:13 AM2021-09-02T05:13:15+5:302021-09-02T05:13:15+5:30
बुलडाणा : रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली, तरी अजूनही लेकुरवाळ्या समजल्या जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. जनसामान्यांसाठी सोयिस्कर ...
बुलडाणा : रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली, तरी अजूनही लेकुरवाळ्या समजल्या जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. जनसामान्यांसाठी सोयिस्कर असलेल्या या गाड्या बंद असल्यामुळे जिल्ह्यातील पाच छोटी रेल्वेस्थानके बंदच आहेत. कोणीही प्रवासी फिरकत नसल्यामुळे एकेकाळी गजबजून राहणाऱ्या या स्टेशनला अवकळा आली आहे.
मध्य रेल्वेचा मुंबई ते कोलकाता हा महत्त्वपूर्ण लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. या लोहमार्गावर शेगाव, नांदुरा व मलकापूर या तीन मोठ्या स्थानकांसह जलंब, चांदूरबिस्वा ही छोटी स्थानके आहेत. तर खामगाव हेदेखील छोटे स्थानक असून येथे जाण्यासाठी जलंब येथून स्वतंत्र मार्ग आहे. कोरोनापूर्वी पॅसेंजर गाड्या सुरू होत्या, तेव्हा या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असायची. कोरोना काळात जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद असल्याने या स्थानकांवर आता कोणत्याही गाड्या थांबत नाहीत. छोट्या स्थानकांवर केवळ पॅसेंजर गाड्यांना थांबा आहे. मेल, एक्स्प्रेस, सुपरफास्ट गाड्या या छोट्या रेल्वेस्थानकांवरून निघून जातात. पॅसेंजर गाड्या नसल्याने या रेल्वेस्थानकांवर आता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही दिसून येत नाही. एकेकाळी प्रवाशांचा राबता असलेली ही छोटी रेल्वेस्थानके ओस पडली आहेत. पॅसेंजर गाड्या सुरू करून जनसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जनतेमधून होत आहे.
बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या
५११८३ भुसावळ-नरखेड
५११९८ वर्धा-भुसावळ
५१२८६ नागपूर-भुसावळ
५७५८१ अकोला-पूर्णा
५७५३९ अकोला-परळी
अकोला-पूर्णा डेमू गाडी सुरू
दक्षिण-मध्य रेल्वेने अकोला ते पूर्णापर्यंत डेमू गाडी सुरू केली आहे. ही गाडी छोट्या स्थानकांवरही थांबते; परंतु या गाडीचे तिकीट जास्त आहे. या लोहमार्गावर पूर्वी अकोला-पूर्णा व अकोला-परळी या पॅसेंजर गाड्या धावत होत्या.
एक्स्प्रेस सुरू, मग पॅसेंजर बंद का?
कोरोनाकाळात सर्व गाड्या बंद होत्या. आता एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून कोरोना पसरत नाही. केवळ पॅसेंजर गाड्यांमधूनच कोरोना पसरतो का, एक्स्प्रेस गाड्या धावू शकतात, तर पॅसेंजर गाड्याही सुरू व्हायलाच हव्या.
-मंगला घोपे, जलंब
भुसावळ किंवा बडनेरा, वर्धाकडे जाण्यासाठी पॅसेंजर गाड्या सोयिस्कर होत्या. कमी तिकिटात प्रवास करता येत होता. आता एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जादा तिकीट मोजावे लागत आहे. शासनाने पॅसेंजर गाड्या सुरू केल्या पाहिजे.
-उमाकांत कांडेकर, जलंब.
बंद असलेली रेल्वे स्थानके
नागझरी, जलंब, खुमगाव बुट्टी, चांदूर बिस्वा, खामगाव