पासपोर्ट हे देशाच्या नागरिकत्वाचे महत्वाचे प्रमाणपत्र - प्रतापराव जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 03:50 PM2019-01-25T15:50:13+5:302019-01-25T15:50:35+5:30
बुलडाणा: बदलत्या युगाचा साक्षीदार होत सध्या समाज वावरत आहे. कधी काळी केवळ उच्चभ्रू, धनदांडगे नागरिकांची ओळख असलेले पासपोर्ट हा पुरावा आता सर्वसामान्यांचा होत आहे.
बुलडाणा: बदलत्या युगाचा साक्षीदार होत सध्या समाज वावरत आहे. कधी काळी केवळ उच्चभ्रू, धनदांडगे नागरिकांची ओळख असलेले पासपोर्ट हा पुरावा आता सर्वसामान्यांचा होत आहे. परदेश गमन करणार्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत विदेशात देशाच्या नागरिकत्वाचा महत्त्वाचा पुरावा म्हणून पासपोर्टकडे बघितल्या जाते. त्यामुळे पासपोर्ट हा नागरिकत्वाचे अत्यंत महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे, असे प्रतिपदान खा. प्रतापराव जाधव यांनी गुरूवारी येथे केले. भारतीय डाक विभाग व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने डाक अधिक्षक कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून नगराध्यक्षा नजमुन्नीसा शेख सज्जाद, उपाध्यक्ष विजय जायभाये, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी सी. एल. गौतम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, नागपूर क्षेत्राचे रामचंद्र किसन जायभाये, जिल्हा डाक अधिक्षक आनंद सरकार, बुलडाणा बाजार समितीचे सभापती जालींधर बुधवत, संजय गायकवाड, शेख सज्जाद उपस्थित होते. पासपोर्ट मिळविण्यासाठी नागपूरला जाण्याची वेळ व खर्च वाचला असल्याचे सांगत खासदार जाधव म्हणाले, ट्रॅव्हल्स कंपन्याच्या माध्यमातून पदरदेशात पर्यटनासाठी जाणार्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच शिक्षण, व्यवसाय करण्यासाठीसुद्धा अनेक नागरिक परदेशात जात आहे. त्यामुळे पासपोर्टची आवश्यकता वाढली आहे. या पासपोर्ट सेवा केंद्रामधून नागरिकांची सोय झाली असून बुलडाणा शहराचे महत्त्वही वाढले आहे. केवळ संदेशवहनासाठी परिचित असलेल्या डाक विभागाने तंत्रज्ञानाच्या युगात नवीन रूपडे पांघरले आहे. या सुविधेसोबतच डाक अधिक्षक कार्यालयाने येथे कायमस्वरूपी रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव द्यावा. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून नियमित आरक्षण केंद्र सुरू केले जाईल, असे ते म्हणाले. पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये म्हणाले, डाक विभागात मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. वेळेच्या परिवर्तनानुसार आधार नोंदणी व नुतनीकरण केंद्र, इंडिया पोस्ट पेयमेंट बँक, पोस्ट आॅफिस सेव्हींग बँक आदी सुविधा सुरू झाल्या आहेत, असे ते म्हणाले. प्रास्ताविकात पासपोर्ट अधिकारी गौतम म्हणाले की, या पासपोर्ट सेवा केंद्रातून केवळ जिल्ह्यातीलच नाही, तर अन्य जिल्ह्यातील नागरिकही अर्ज करू शकणार आहे. जालना जिल्ह्यासाठीसुद्धा येथून पासपोर्ट देता येणार आहे. बुलडाणा हा दूरचा जिल्हा असल्याने येथील नागरिकांना पासपोर्टसाठी नागपूरला जावे लागायचे. तो त्रास त्यांचा थांबणार आहे. संचलन संगणक प्रणाली प्रशासक प्रल्हाद कचरे यांनी तर आभार आनंद सरकार यांनी केले.
जिल्ह्यात पाच हजार पासपोर्टचे व्हेरीफिकेशन
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ म्हणाले की, पासपोर्टसाठी पोलीस चारित्र्य पडताळणी महत्वाचा भाग असते. त्यामुळे पासपोर्ट कार्यालय व पोलीस विभाग यांचे कार्य एकमेकास पुरक आहे. पोलीस पडताळणीसाठी पोलीस विभागानेही तंत्रज्ञानाच्या उपयोगाने कमी कालावधीत पडताळणी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. जिल्ह्यात दरवर्षी पाच हजार पासपोर्ट पोलीस व्हेरीफिकेशन येत असतात. पेन पासपोर्ट प्रणालीही जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी टॅब्लेटही उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.