सहा महिन्यांतच शेगाव-पंढरपूर रस्त्याचे पितळ उघडे; रस्त्याला ‘ठिगळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 06:30 PM2018-12-10T18:30:24+5:302018-12-10T18:47:13+5:30
खामगाव : शेगाव-पंढरपूर रस्ता सुमार दर्जामुळे उखडत असल्याचे दिसून येते. तर काही या रस्त्याला मोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे या रस्त्याला निर्माणावस्थेतच जागोजागी ‘ठिगळ’ (पॅचिंग) केल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शेगाव-पंढरपूर रस्ता सुमार दर्जामुळे उखडत असल्याचे दिसून येते. तर काही या रस्त्याला मोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे या रस्त्याला निर्माणावस्थेतच जागोजागी ‘ठिगळ’ (पॅचिंग) केल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.
खामगाव-शेगाव मार्गाचे शेगाव ते पंढरपूर दरम्यान चौपदरीकरण करण्यात येत आहे. सुरूवातीला अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामाने गती घेतली आहे. दरम्यान, कॉक्रीटीकरणाच्या सुमार दर्जामुळे या रस्त्याच्या कामाला निकृष्टतेचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या पाहणीत या रस्त्याचे काम निकृष्ट आढळून आल्याने, ३०० पेक्षा जास्त रस्ता रद्द ठरविण्यात आला. त्यामुळे रस्ता निर्मितीचा कंत्राट असलेल्या कंत्राटदाराकडून हा रस्ता रातोरात उखडण्यात आला होता. तथापि, आता या रस्त्याला काही ठिकाणी खड्डे पडत आहेत. ही ‘पोल’खोल झाकण्यासाठी सिमेंटचे पॅचिंगही बसविण्यात येत आहे. शेगाव रोडवरील एका महाविद्यालयानजिक या रस्त्याला मोठा खड्डा पडल्याने, रात्रीतून या ठिकाणी पॅच लावण्यात आला. तर खामगावकडून जाताना एका महाविद्यालया नजीकही तीन ठिकाणी मोठे पॅच बसविण्यात आलेत. यासंदर्भात इगल इन्फ्रास्ट्रक्चरचे सतीश मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
रस्त्याला तडे आणि खड्डेही!
शेगाव-पंढरपूर रस्त्याचे चौपदरीकरण करताना कॉक्रीटीकरण केले जात आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असतानाच, या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडत आहे. काही ठिकाणी गिट्टी बाहेर येत असून काही ठिकाणी या रस्त्याला तडे जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. काँक्रीटीकरण पूर्ण होवून तीन महिने उलटत नाही, तोच रस्ता खराब होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेगाव-पंढरपूर रस्त्याच्या कामाचे नियमित मुल्यांकन केले जात आहे. निर्मितीपासून ४ वर्षांच्या कालावधीत तुटफूट झाल्यास, कंत्राटदाराकडूनच दुरूस्तीच्या तरतुदीचा समावेश करारपत्रात आहे. रस्त्याची पाहणी केली जाईल. निकृष्ट दर्जाचे काम रद्द समजले जाईल.
- रावसाहेब झाल्टे, कार्यकारी अभियंता, राज्य महामार्ग, अकोला.